Type Here to Get Search Results !

गणेशोत्सवासाठी २७ ऑगस्टला पोलीस प्रमुखांची बैठक


मुंबई - १३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी राज्यातील कायदा व सुव्यस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक २७ ऑगस्ट रोजी राज्याच्या पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दोन दिवस चालणार असून या उत्सवात कोणतीच अप्रिय घटना घडू नये म्हणून, कोणती खबरदारी घेतली गेली पाहिजे, यावर चर्चा होणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर हे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला राज्यातील सर्व जिल्हा पोलीस प्रमुख आयुक्त, सहआयुक्त आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सध्या चिघळला असून राज्याच्या अनेक भागात समाजाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. या आंदोलनांच्या वेळी काही भागात हिंसक घटना घडल्या. याच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान कोणतीही अनुचित अथवा अप्रिय घटना घडू नये, यासाठी यावेळी पोलिसांना दक्ष राहावे लागणार आहे. भिवंडी, मालेगाव, औरंगाबाद, पुणे व नाशिक येथील संवेदनशील भागात जादा पोलिसांची कुमक तैनात करावी लागणार आहे. राज्यातील काही भागात पोलीस दल अपुरे पडत असेल, तर बाहेरील राज्यातील पोलिसांची कुमक मागवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सव शांततेने पार पडण्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad