
मुंबई - भारत लेखा मानक (इंड एएस ११५) हे नवे लेखा मानक लागू केल्यामुळे बांधकाम क्षेत्रातील (रिअल इस्टेट) शेअर बाजारात नोंदणीकृत ९ बड्या कंपन्यांचे नक्त मूल्य (नेटवर्थ) १८ टक्क्यांनी घटले असून, त्यांच्या उत्पन्नातही २३.६ टक्के घट झाली आहे. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीमधील ही स्थिती आहे. इंड एएस ११५ हे मानक या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात आले आहे. यापूर्वीच्या लेखा मानकानुसार कंपन्या आपल्या निर्माणाधीन प्रकल्पांच्या पूर्ण झालेल्या भागांच्या आधारावर आपले उत्पन्न आणि बचत वगैरे तिमाही ताळेबंदामध्ये दाखवत होत्या. मात्र, एप्रिल महिन्यापासून लागू झालेल्या नव्या मानकामुळे कंपन्यांना १ एप्रिलपर्यंत जे प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत त्यांचा दाखवलेला लाभ मागे घ्यावा लागला. त्यामुळे एप्रिल ते जून या तिमाहीतील या कंपन्यांचे नक्त मूल्य आणि उत्पन्नात मोठी घट दिसून आली आहे. या कंपन्यांच्या नक्त मूल्यामध्ये झालेली ही घट तब्बल ११ हजार २७९ कोटी रुपयांची आहे. गोदरेज प्रॉपर्टी, प्रस्टिज इस्टेट्स प्रोेजेक्ट्स, ब्रिगेड एंटरप्रायझेस, डीएलएफ, इंडिया बुल्स रियल इस्टेट, फिनिक्स मिल्स, शोभाग, महिंद्रा लाइफ स्पेस डेव्हलपर्स आदींचा समावेश या कंपन्यांमध्ये आहे.