Type Here to Get Search Results !

रेल्वे मार्गावर सेमी एसी लोकल


मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावरील लाखो मुंबईकरांचा रोजचा गर्दीचा प्रवास गारेगार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने उपनगरीय रेल्वे मार्गावर सेमी एसी लोकल चालवण्याची घोषणा केली. सेमी एसी लोकलमध्ये सहा डबे एसी तर सहा डबे साधे असणार आहेत. त्यामुळे ज्यांना एसीचा प्रवास परवडणारा आहे, त्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. असे असले तरी या सेमी एसी लोकलसाठी मुंबईकरांना आणखी एक ते दीड वर्षाची वाट पाहावी लागणार आहे, तर सेमी एसी लोकल करण्यासाठी मेधा आणि बम्बार्डियर कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे.

भारतीय रेल्वेच्या चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमधून उपनगरीय रेल्वेसाठी ३९ एसी लोकल येणार आहेत. या गाड्या टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होणार आहेत. या संपूर्णपणे एसी असलेल्या लोकलच्या नंतर ७८ सेमी एसी लोकल केल्या जाणार आहेत. या सेमी एसी लोकल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक साहित्याचा पुरवठा करण्याचे काम भारतीय बनावटीच्या मेधा आणि परदेशी तंत्रज्ञानाच्या बम्बार्डियर कंपनीला देण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये एक एसी लोकल मुंबईत येणार आहे. या लोकलपासून दोन सेमी एसी लोकल तयार करण्यात येणार आहेत. मुंबईमधील कारशेडमध्ये सेमी एसी लोकलची बांधणी करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या एकच एसी लोकल धावत आहे. या एसी लोकलच्या दिवसाला बारा फेऱ्या चर्चगेट ते विरारपर्यंत चालवण्यात येतात. एसी लोकलच्या १२ फेऱ्यांसाठी साध्या लोकलच्या १२ फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये काहीशी नाराजी पसरलेली आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वच प्रवाशांना एसी लोकलचा प्रवास आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. परिणामी एसी लोकलसाठी साध्या लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात येऊ नयेत, असा विचार करून रेल्वे प्रशासनाने सेमी एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून सामान्य आणि एसी लोकलच्या प्रवाशांना एकाच लोकलमधून प्रवास करणे शक्य होणार आहे.
Tags

Top Post Ad

Below Post Ad