Type Here to Get Search Results !

भारतात पहिल्यांदा हंबोल्ट पेंग्विनचा जन्म


मुंबई - कोरियातून राणी बागेत आणलेल्या हंबोल्ट पेंग्विनच्या मादीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. 15 ऑगस्टला रात्री गोंडस पिल्लाचा जन्म झाला. या छोट्या पेंग्विनची प्रकृती स्थिर असून त्याला आणखी 16 तास प्राणी संग्रहालय अधिकार्‍यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्याचे लिंग तपासण्यासाठी त्याची डीएनए तपासणी केली जाणार आहे.

मुंबईतील राणी बागेत 26 जुलै 2016 रोजी कोरियावरून हंबोल्ट जातीचे 8 पेंग्विन आणण्यात आले होते. त्यामध्ये 3 नर व 5 मादी पेंग्विन होते. डॉनल्ड, डेझी, पपाय, डोरी, ऑलिव्ह, बबल, मोल्ट, फ्लिपर, अशी त्यांची नावे होती. त्यांना खास बनविण्यात आलेल्या शीत वातावरणातील कक्षात ठेवण्यात आले होते. 5 जुलैला अंडे दिल्यानंतर फ्लिपर आणि मोल्ट दोघेही अंड्याला ऊब देत होते. यामध्ये फ्लिपर सर्वात जास्त 5 दिवस अंड्याला ऊब दिली. भारतातील पहिलीच घटना असल्याने प्राणी संग्रहालयातील डॉक्टर सातत्याने विदेशातील तज्ज्ञांच मार्गदर्शन घेत होते. राणी बागेचे खास आकर्षण असलेल्या पेंग्विन कक्षात एका गोंडस पेंग्विनचा जन्म झाला. त्यामुळे पेंग्विन कक्षात जल्लोषाचे वातावरण आहे. तेथील सात पेंग्विनच्या कुटुंबात या नवीन भिडूला पाहण्यासाठी मुंबईकरही आतुर झाले आहेत.

पिल्लाची काळजी घेण्यात व्यस्त - 
मोल्ट आणि फ्लिपर दोघेही एखादे घरटे शोधून तेथेच आपला वेळ जास्त व्यतीत करीत होते. यावेळी आळीपाळीने अंडी उबवण्याचे काम करीत होते. पण फ्लिपरकडून अंडी उबवण्यासाठी जास्त वेळ द्यायची. सध्या दोघही आपल्या पिल्लाची काळजी घेण्यात व्यस्त असून हे पिल्लू मोठे होण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागेल, असे राणीबागेतील पशूवैद्यक डॉ. मधुमती काळे यांनी सांगितले.

नव्या पाहुण्याचे वजन 75 ग्रॅम -
या नव्या पाहुण्याचे वजन 75 ग्रॅम असून बाळ- बाळंतीण सुखरूप आहेत. आई – बाबा आपल्या पिल्लाला जास्त वेळ देत असून फ्लिपर आपल्या पिल्लाचे पोट भरण्याची काळजी घेत आहे. नव्या प्रजनन कक्षातील पोषक वातावरणामुळे पेंग्विनच्या आता जोड्या जमल्या असल्याचे वीर जिजामाता भोसले प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

नामकरण करण्याचा बालहट्ट -
अंधेरीत राहणार्‍या मिश्का मंगुर्डेकर या सहा वर्षाच्या चिमुरडीला राणीच्या बागेत येणार्‍या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे आनंद झाला. जुहूच्या बेसेंट मॉंटेसरी शाळेत पहिल्या इयत्तेत शिकणार्‍या या मुलीने आपण सुचवलेले नाव पेंग्विनला द्यावे असा बालहट्ट केला आहे. पिल्लू नर असल्यास अपोलो आणि मादी असल्यास वेलव्हेट, व्हॅनिला, आर्इस क्युब अशी नावांची यादी तयार केली असून ती राणीबाग प्रशासनाकडे पाठवली आहे.
Tags

Top Post Ad

Below Post Ad