Type Here to Get Search Results !

चर्चगेट रेल्वे स्थानकातील गर्दी कमी झाली


मुंबई - मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाची स्थानके अशी ओळख असलेल्या अनुक्रमे सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकांवरील गर्दी कमी होताना दिसत आहे. उपनगरांमध्ये असलेले जागांचे कमी दर यामुळे लोकसंख्येची टक्केवारी शहर भागात कमी होत आहे. तसेच रेल्वेला पर्याय म्हणून खाजगी वाहनांची वाढलेली संख्याही या मागील प्रमुख कारण आहे. चर्चगेट ते प्रभादेवी दरम्यानच्या आठ स्थानकांतील प्रवासी संख्या कमी झालेली आहे. परिणामी या स्थानकांतून पश्चिम रेल्वेला मिळणारे उत्पन्नही घटले आहे.

चर्चगेट येथून २०१४-१५ मध्ये एक लाख २५ हजार २२९ प्रवासी प्रवास करत होते. २०१६-१७ मध्ये हीच संख्या एक लाख दोन हजार ५३६ वर आली. २०१७-१८ मध्ये ती आणखी म्हणजे ९६ हजार ३४६ वर उतरली. तर २०१६-१७ मध्ये सहा लाख ७२ हजार १६३ रुपयांपर्यंत असणारे रेल्वेचे उत्पन्नही आता सहा लाख ५८ हजार रुपयांवर आले आहे. प्रवासी संख्या व उत्पन्न घटण्यामध्ये चर्चगेटपाठोपाठ चर्नी रोड स्थानकाचा दुसरा नंबर लागतो. त्यानंतर मरिन लाइन्स, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी स्थानकांचा नंबर लागत असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. शहरी भागांत घरांच्या किमतीही परवडणाऱ्या नसल्याने आणि स्वस्तात मोठे घर मिळत असल्याने शहरी भागांतील छोट्या घरांमध्ये राहणाऱ्यांनी उपनगरातील मोठ्या घरांकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे शहरी भागांतील रेल्वे स्थानकातील प्रवासी संख्येवरही परिणाम झाला असून प्रवासी संख्या कमी होत गेली. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते प्रभादेवीपर्यंतच्या स्थानकांतील दररोजची प्रवासी संख्या घटल्यामुळे उत्पन्नही गेल्या दोन वर्षांत कमी झाले आहे.

पश्चिम रेल्वेवर दोन वर्षांपूर्वी राम मंदिर स्थानक प्रवाशांच्या सेवेत आले. २०१६-१७ मध्ये ५,२६६ असलेली प्रवासी संख्या २८ हजार ७७१ पर्यंत गेली आहे. उपनगरातील मालाड, कांदिवली, बोरिवली, नालासोपारा, विरार स्थानकांतील प्रवासी संख्या व उत्पन्न वाढते आहे. या भागांत रहिवासी संकुले मोठ्या प्रमाणात उभी राहत आहेत. त्यामुळे येथे स्वस्तात मोठी घरे घेण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यातही बोरिवली व विरारमध्ये जास्त मागणी आहे.
Tags

Top Post Ad

Below Post Ad