
मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री तसेच माजी खासदार गुरुदास कामत यांचे दिल्ली येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुवारी त्यांच्यावर चेंबूर चरई स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कामत याचे पुत्र डॉ. सुनील कामत यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
बुधवारी दिल्ली येथून त्यांच्या पार्थिव चेंबूरच्या आचार्य उद्यान येथील राहत्या घरी आणण्यात आले होते. गुरुवारी सकाळपासूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी गर्दी केली होती. सकाळी त्यांचे पार्थिव नेते आणि कार्यकर्त्यांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच लोकसभेतील काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खडगे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता, विनोद तावडे, खासदार नारायण राणे आणि इतर राजकीय पुढाऱ्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले.