१५ दिवसांत साथीच्या आजाराने ६ जणांचा मृत्यू

मुंबई - मुंबईत गेल्या १५ दिवसांत विविध आजारांनी ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ३ डेंग्यूने, तर २ लेप्टोच्या रुग्णांचा समावेश आहे. 

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार उद्भवतात. यंदाही साथीच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. किरकोळ पडणाऱ्या पावसाच्या सरी व मध्येच पडणारे कडक ऊन या वातावरणातील बदलामुळे विविध आजारांनी मुंबईकर बेजार झाले आहेत. पालिकेचे, खाजगी दवाखाने तसेच मुंबई मनपासह विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. गेल्या १५ दिवसांत म्हणजेच १६ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान मुंबईत मलेरियाचे ३८९, लेप्टो १८, डेंग्यू ७४, गॅस्ट्रो २६९ व हेपेटायटिस ३४ असे एकूण ७८४ रुग्ण आढळले. तसेच डेंग्यूचे संशयित ११३४ रुग्ण आढळून आले. त्यापैकी डेंग्यूमूळे ३ जणांचा मृत्यू झाला. लेप्टोने २, तर मलेरियाने एक जण दगावला. डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्यांमध्ये २० वर्षीय व ३५ वर्षीय तरुणाचा तसेच एका ५२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर लेप्टोमुळे मृत्युमुखी पडलेल्यात एम/ईस्ट विभागातील ७ वर्षांच्या बालकासह ३५ वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
Tags