घाटकोपरमध्ये पुन्हा एका रात्रीत तीन घरफोड्या

Anonymous
मुंबई - घाटकोपरमध्ये पुन्हा एकाच रात्री तीन घरात घरफोड्या झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घाटकोपरच्या भटवाडी विभागात समर्थ निवास सोसायटीमध्ये चाळीतील तीन घरे एकाच रात्री चोरांनी फोडली आहेत. या विभागात राहणारे मनोहर धोंडू घुमे, सुभाष देशमुख, अल्केश सुर्वे ही तिन्ही कुटुंबे घराला टाळे मारून गावाला गेले होते. मंगळवारी जेव्हा दूध विक्री करणाऱ्या व्यक्तीने या घराचे दरवाजे उघडे असल्याचे पाहिले, तेव्हा या घरात घरफोडी झाल्याचे नागरिकांना कळले. याचबरोबर या विभागात उभी असलेली तेजस दंत यांची केटीएम ही महागडी दुचाकी चोरीला गेली आहे. मनोहर घुमे यांच्या घरातून लॅपटॉप, पन्नास हजार रोख आणि अडीच तोळ्यांचा सोन्याचा हार, अल्केश सुर्वे यांच्या घरातून सोन्याचे पाच ग्रॅमचे पान आणि पाच हजार रुपये रोख रक्कम आणि देशमुख यांची ५९ हजार रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. या अगोदर घाटकोपरच्या पारशीवाडी, त्यानंतर चिराग नगर आणि आता भटवाडी विभागात घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तिन्ही घरफोडीत चोरी करण्याची पद्धत सारखीच असल्याने या विभागात एखादी घरफोडी करणारी टोळी सक्रिय झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Tags