Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी जागतिक योजना


संयुक्त राष्ट्र - जीवघेण्या क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जागतिक पातळीवर लवकरच एक योजना आखली जाणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांनी अशा प्रकारची योजना तयार करण्यावर सहमती दर्शवली आहे. त्यानुसार क्षय रुग्णांना अल्पदरात औषध उपलब्ध करून देण्याबरोबर अमेरिकेसोबत या मुद्द्यावर सुरू असलेला वाद सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.

संसर्गजन्य रोगांपैकी जगभरात सर्वाधिक मृत्यू हे क्षयरोगामुळे होतात. त्यामुळे २०३० पर्यंत हा जीवघेणा आजार पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचा विडा संयुक्त राष्ट्राने उचलला आहे. अनेक आठवडे चाललेल्या क्लिष्ट चर्चेनंतर अखेर शुक्रवारी अंतिम घोषणापत्राला मंजुरी देण्यात आली. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या बैठकीव्यतिरिक्त २६ सप्टेंबर रोजी पहिल्यांदाच क्षयरोगावर शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये अधिकृतरीत्या घोषणापत्र स्वीकारले जाईल. अल्प दरातील औषधे गरीब राष्ट्रापर्यंत पोहोचत नसल्यावरून दक्षिण आफ्रिकेची अमेरिकेसोबत चांगलीच खडाजंगी झाली होती. दोन्ही देशांमध्ये झालेले हे वाक्युद्ध कथित ट्रिप्स व्यापार व्यवस्थापनासंदर्भात होते. हे व्यवस्थापन बौद्धिक संपदेच्या हक्काशी निगडित आहे. ५३ सूत्री अंतिम घोषणापत्रानुसार शिखर परिषदेमध्ये जागतिक नेते २०३० पर्यंत क्षयरोगाचा नायनाट करण्याची कटिबद्धता व्यक्त करतील. हे ध्येय गाठण्यासाठी वर्षाला १३ अब्ज डॉलरचा खर्च केला जाईल. याशिवाय क्षयरोगासंबंधीच्या संशोधनासाठी जगभरात दोन अब्ज डॉलरचा अतिरिक्त निधी खर्च केला जाईल. सध्याला यावर ७० कोटी डॉलर खर्च केले जातात. गतवर्षी जागतिक आरोग्य संस्थेने वाढत चाललेल्या क्षयरोगाच्या धोक्यावर तीव्र चिंता व्यक्त केली होती. संसर्गजन्य रोगांमध्ये क्षयरोगाने एड्स/एचआयव्हीसारख्या घातक आजारांना मागे सोडल्याचे संस्थेने म्हटले होते. जगभरात होणाऱ्या मृत्यूच्या कारणांमध्ये क्षयरोग नवव्या क्रमांकावर आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom