बोधगया यात्रेस सरकारकडून अनुदान द्या - भिक्कू संघाची मागणी

Anonymous

मुंबई - महाराष्ट्रातून बोधगया यात्रेस वर्षातून एकदा जाणाऱ्या बौद्ध भिक्खू बांधवांकरता राज्य शासनाकडून आर्थिक अनुदान, सबसिडी सहाय्य मिळावे, राज्यातील शासकीय तथा महापालिका रुग्णालयात बौद्ध भिक्खू बांधवांना मोफत वा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत अशा विविध मागण्या भन्ते विरत्न थेरो यांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे केल्या आहेत.

भारतीय बौद्ध भिक्खू संघाचे मुंबई कार्याध्यक्ष भन्ते विरत्न थेरो यांनी संघ भिक्खू बांधवांसह महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांची बुधवार, ३ ऑक्टोबर रोजी भेट घेतली आणि नवनियुक्तीबद्दल शुभेच्छा स्वरूपात जगाला सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांची प्रतिमाही भेट दिली. यावेळी झालेल्या चर्चेत भिक्खू बांधवांनी त्यांच्या मागण्या व विविध प्रश्न शेख यांच्यासमोर मांडल्या.

या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून या मागण्या निकाली काढण्यासाठी आग्रही राहणार असल्याचे शेख यांनी भिक्खू बांधवांना आश्वासन दिले. शिवाय आजवर अल्पसंख्याक समाज म्हणजे केवळ मुस्लिम समाज हा जनतेच्या मनातील संभ्रम दूर करून अल्पसंख्याक समाजातील सर्वच घटकांना त्यांचा संवैधानिक अधिकार मिळवून देण्यास कटिबद्ध असून शासन म्हणून स्वत: जनतेच्या दरबारी जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेऊ आणि सामाजिक शांतता राखण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू, असे शेख यावेळी म्हणाले.