शौचालयांच्या निविदांना १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Anonymous

मुंबई - स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत शौचालय बांधण्यासाठी २३ निविदांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे पालिकेने निविदा प्राप्त होण्याची मुदत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. पुढील आठवड्यात शुक्रवारी स्थायी समितीची सभा असून, त्यात या मुदतवाढीवरून सदस्य प्रशासनाला पुन्हा धारेवर धरण्याची शक्यता आहे.

मुंबईतील सर्व विभागांमध्ये आरसीसी आणि जैविक शौचालयांचे नियोजन, संकल्पचित्रे व बांधकाम करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचा कंत्राट कालावधी वाढवण्यात आला आहे. सामुदायिक शौचालय बांधण्याचे कंत्राट (लॉट-१०) वर्ष २०१६ मध्ये देण्यात आले. ३० सप्टेंबरपर्यंत लॉट १० अंतर्गत फक्त २७२० शौचकूपे बांधून पूर्ण झाली असून, १ हजार ७२४ कामे प्रगतीपथावर असल्याने नगरसेवकांनी प्रशासनावर सडकून टीका केली आहे. लॉट ११ अंतर्गत एकूण २२ हजार ७७४ शौचकूपे बांधण्याचे प्रस्तावित आहे. पण निविदाकारांना अतिउच्च दराने उद्धृत केल्याने निविदाकारांसोबत अनेक वेळा दर कमी करण्यासाठी वाटाघाटी केली, मात्र ते यशस्वी झाले नाहीत. आजतागायत ३८ निविदांपैकी १५ निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'ए' विभागात १८४, 'डी' मध्ये २१४, 'के' पूर्वमध्ये ५६०, 'के पश्चिम'मध्ये ७९१, 'पी उत्तर'१ मध्ये ९००, दोनमध्ये ७८०, तीनमध्ये ७३०, आर उत्तरमध्ये १०१५, टी मध्ये २००, एच पूर्वमध्ये ७४२, पी उत्तरमध्ये भाग ४ मध्ये ६६६, पी उत्तर भाग-५ मध्ये ७००, आर मध्य मध्ये ४१९ एम पूर्वमध्ये भाग ७ मध्ये ५४७, एस विभागात ८३४ अशा एकूण ९२८२ निविदा प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित २३ निविदांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे निविदांचा कालावधी वाढवावा लागला आहे.  
Tags