तिकीट मशीन्स तुटवड्याने बेस्टमध्ये मासिक पास देणे बंद ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 October 2018

तिकीट मशीन्स तुटवड्याने बेस्टमध्ये मासिक पास देणे बंद ?


मुंबई - बेस्टचा तोटा कमी करण्यासाठी तिकीट दरवाढीप्रमाणेच ताफ्यातील ९०० बसची संख्या कमी करण्यासारख्या अनेक निर्णय उपक्रमावर विपरित परिणाम करणार आहेत. ई-तिकीट मशीन्स तुटवड्याने बेस्टमध्ये मासिक पास देणे बंद करणे, विद्युत आणि परिवहन उपक्रम स्वतंत्र करण्याचा प्रस्ताव आदी वेगवेगळ्या धोरणांमुळे बेस्टची सेवा हळूहळू ढासळवण्याचे प्रयत्न नियोजन पद्धतीने आहे. त्यातून सार्वजनिक वाहतूक सेवा संपुष्टात येईल, अशी भीती आमची मुंबई, आमची बेस्ट नागरिक मंचाने व्यक्त केली आहे.

बेस्ट उपक्रमाने सादर केलेल्या २०१९-२०२० च्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मंचाने बेस्टचे अस्तित्व टिकवण्यासाठी चिंता व्यक्त केली आहे. बेस्ट उपक्रमाचा तोटा अर्थसंकल्पात ७२० कोटी रुपये अपेक्षित असून, एकूणच उपक्रम टिकण्याऐवजी त्याचा स्तर घसरत चालला असल्याबद्दल आमची मुंबई, आमची बेस्टतर्फे चिंता व्यक्त केली आहे. या नागरिक मंचाने काही मुद्द्यांच्या अनुषंगाने त्याचे विश्लेषण केले आहे. ही सेवा आकुंचित पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले आहे. एका ठरावीक टप्प्यानंतर बेस्ट सेवेचे हे आकुंचन या सेवेस मारक ठरेल, असा इशाराही दिला आहे. चांगल्या बससेवेविना मुंबई ही प्रदूषण, वाहतूक कोंडी, अकल्याणकारी सार्वजनिक व्यवस्थेचे बळी ठरेल. त्यामुळे मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनाने बेस्ट सेवा पूर्वीप्रमाणेच सक्षम करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली आहे. आमची मुंबई, आमची बेस्टतर्फे बेस्टसाठी जनतेचा आराखडा सादर करण्यात आला होता. त्या सूचनांकडे दुर्लक्ष करून उलट स्तरावर प्रवास सुरू असल्याची भूमिका मंचातर्फे मांडण्यात आली आहे. बेस्टने मासिक पास देणे बंद केले असून, त्यास इ-तिकीट मशीन्सचा तुटवडा कारणीभूत आहे. या तुटवड्यामुळे स्मार्ट कार्ड पुरवता येत नाही. त्यासाठी बेस्ट प्रशासनाप्रमाणेच समिती जबाबदार असल्याचाही दावा मंचाने केला आहे. बेस्टने अनेक आगारांच्या पुनर्विकासाचे हक्क विकासकांना दिले आहेत. पण त्यांच्याकडून सुमारे ३५० कोटी रुपये एका वर्षात वसूल केले नसल्याचा मुद्दाही उपस्थित केला आहे.

बेस्ट व्यवस्थापनाने विद्युत उपक्रमास बेस्टपासून स्वतंत्र करून वेगळी कंपनी निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. बेस्टच्या परिवहन उपक्रमास वीज उपक्रमातून गेल्या सात दशकांपासून सहाय्य मिळाले आहे. त्याबाबत मुंबई महापालिकेस पत्रव्यवहार केला गेला. पण अशा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे नागरिक मंचातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. बेस्ट उपक्रम वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी सजग मुंबईकर म्हणून प्रयत्न केले जात असल्याचे मंचातर्फे ज्येष्ठ पत्रकार विद्याधर दाते यांनी सांगितले.

Post Bottom Ad