भीमा-कोरेगावला पोलिसांचा मोठा बंदोबस्त

मुंबई - पुण्यातील भीमा-कोरेगावची पुनरावृत्ती या वेळी होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली असून, या वेळी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी एका दैनिकाला दिली आहे. 

भीमा-कोरेगाव येथील स्मृतिस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारी रोजी गतवर्षीपेक्षा जादा अनुयायी येण्याची शक्यता असून, या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सर्व प्रकारची खबरदारी घेतल्याचे महासंचालक म्हणाले. लाखो अनुयायांवर पाळत ठेवण्यासाठी तसेच गडबड, गोंधळ करण्याच्या इराद्याने आलेल्या अनुयायांवर लक्ष ठेवण्यासाठी 'ड्रोन' चाही वापर केला जाणार आहे. जी उपलब्ध अत्याधुनिक उपकरणे पोलिसांच्या भात्यात आहेत तिचा या वेळी योग्य पद्धतीने उपयोग केला जाणार असल्याचे पडसलगीकर यांनी सांगितले. या स्मृतिस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मुंबई-पुणे व अन्य भागांतून येणाऱ्या हजारो अनुयायांच्या गाड्यांचे क्रमांक व त्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. जेणेकरून एखादी अप्रिय घटना त्या दिवशी घडली, तर पोलिसांना कारवाई करणे सोपे जाईल. गतवर्षी १ जानेवारीला भीमा-कोरेगाव येथे दोन गटांत झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला होता व लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. गेल्या वर्षी ज्या डाव्या विचारसरणींच्या नेत्यांनी भडकावू भाषण करून अनुयायांची माथी भडकवल्यामुळे जो दंगलीचा प्रकार घडला ते संशयित नेते अद्यापही पोलीस कोठडीची हवा खात आहेत. यंदा स्मृतिस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दीड ते दोन लाख अनुयायी राज्यभरातून येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यामुळे मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असल्याचे पडसलगीकर यांनी सांगितले आहे.