सात दिवसांत मश्चिमारांचे प्रश्न सोडवा, अन्यथा कोस्टल रोड प्रकल्प बंद पाडू


मुंबई - कोस्टल रोड प्रकल्पामुळे कोळी बांधवांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने सात दिवसांत मश्चिमारांचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा प्रकल्प बंद पाडू असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिला.

कोस्टल रोड प्रकल्पाची घोषणा करण्यापूर्वी आणि त्यानंतर भूमिपुजनावेळी कोळी बांधवांना विश्वासात घेतले नाही. कुठल्याही प्रकारचे सादरीकरण दाखवलेले नाही. दोन खाबांच्या मध्ये २०० मीटरचे अंतर सोडवणे अशी मागणी असताना फक्त ५० मीटर अंतर सोडले आहे. खाबांमधील कमी अंतरामुळे बोटींची टक्कर होण्याची भीती आहे. तसेच माशांच्या प्रजनन ठिकाणीच भराव टाकला जात असून २५० बोटी असून मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. कोळी बांधवांना नुकसान भरपाई नको तर मागण्या मान्य करा, अन्यथा कोस्टल रोड प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिला. बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेत ते बोलते होते. कोळी बांधव शेतकऱ्यांप्रमाणे नाही, की जमीन गेली तर दुसरीकडे शेती करु शकतो. वर्षानुवर्षे कोळी बांधव समुद्रात मच्छिमारी व्यवसाय करतात. समुद्र म्हणजे कोळी बांधवांचे घरच आहे. कोस्टल रोड प्रकल्पात मुळचा मुंबईकर कोळी बांधव चिरडला जाणार असेल, तर कोस्टल रोड प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा तांडेल यांनी दिला. मी स्वतः शिवसैनिक असलो तरी प्रथम कोळी बांधव असल्याने पक्ष बाजूला ठेवून कोळी बांधवांसाठी लढा देणार, असेही ते म्हणाले.

शासनाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वपुतळा 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' पेक्षा मोठा २१२ मीटर उंचीचा नरीमन पॉईंट - गिरगाव चौपाटीच्या समुद्रात, हाजीअलीच्या समुद्रात किंवा रेसकोर्सवर उभारा किंवा वांद्रे बॅन्ड स्टॅन्डवरील कार्टड रोडवर उभारा, असे पर्याय संघटनेने दिले आहेत. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध नाही. परंतु, कोळी बांधवांच्या मुळावर कोस्टल रोड प्रकल्प उठल्याचे त्यांनी म्हटले. शिवस्मारक व विनायक मेटे यांचा काहीच संबंध नाही. रात्रीच्या वेळी शिवस्मारकाचे भूमिपुजन केल्याने खऱ्या शिवप्रेमींना काय वाटले असेल. शिवस्मारक बांधायचे असेल, तर अन्य ठिकाणी बांधा. मात्र अरबी समुद्रात शिवस्मारक होऊ देणार नाही, असेही तांडेल म्हणाले.
Tags