हत्येप्रकरणातील आरोपी सचिन पवारला वाचवण्याचा पोलीस अधिकाऱ्यांचा प्रयत्न


मुंबई - घाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी याच्या हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेला प्रमुख आरोपी सचिन पवार याला वाचवण्यासाठी आता वरिष्ठ अधिकारीच प्रयत्न करत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. या हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलेला सचिन व इतर आठ आरोपींना सध्या न्यायालयीन कोठडी मिळाली असून सचिन याचे भाजपा पक्षातील बड्या नेत्याशी जवळचे संबंध असल्यामुळे त्याला वाचवले जात असल्याची चर्चा खुद्द पंतनगर पोलीस ठाण्यात चालू आहे.

सचिन व इतर आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर या विभागाचे उपायुक्त व अतिरिक्त आयुक्त हे रोज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पंतनगर पोलीस ठाण्यात चौकशीच्या नावाखाली ठाण मांडून बसत. सचिन पवार याला न्यायालयीन कोठडी मिळेपर्यंत हे दोघे अधिकारी सतत पोलीस ठाण्यातच मुक्काम ठोकून बसत. विशेष म्हणजे, या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना व तपास अधिकाऱ्याला विश्वासात न घेता परस्पर काही निर्णय हे अधिकारी घेत असत. या दोघा बड्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात घेतलेल्या अतिउत्साहामुळे ठाण्यातील अधिकारी आश्चर्य व्यक्त करत आहेत. इतर कुठल्याही प्रकरणात लक्ष न घालणारे हे दोघे अधिकारी या प्रकरणात इतके कार्यक्षम कसे झाले, याची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात चालू आहे. हिरे व्यापारी उदानी याचे याच भागातील बड्या बिल्डरांशी आर्थिक संबंध होते. या बिल्डरांकडे त्याने शंभर ते दोनशे कोटींची रक्कम गुंतवली होती. राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असल्यामुळे या बिल्डरांनी उदानी याच्या हत्येची सुपारी सचिन पवार याला दिल्याचे या परिसरात बोलले जाते. सचिन याच्या अटकेमुळे भाजपा नेत्यांचे धांबे दणादणाले असून ते त्याला वाचवण्यासाठी पोलीस दबाव आणत असल्याचे बोलले जात आहे..
Previous Post Next Post