Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

खेळामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या तणावपूर्ण कामातून चांगला 'ब्रेक'


नवी मुंबई, दि. 22 : शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण कामातून क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा हा चांगला ब्रेक आहे. त्यामुळे नवीन जोमाने काम करण्यासाठी एक प्रकारची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन प्रधान सचिव वित्त विभाग नितीन गद्रे यांनी आज क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले. संचालनालय, लेखा व कोषागारे आणि संचालनालय स्थानिक निधी लेखा परीक्षा कर्मचारी कल्याण समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2018 चे उद्घाटन आज करण्यात आले.

दि. 22 व 23 डिसेंबर 2018 या कालावधीत स्व.राजीव गांधी क्रीडा संकुल,सेक्टर-4, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई या स्पर्धा होणार आहेत. या कार्यक्रमास अध्यक्ष (DATSWA) महाराष्ट्र राज्य तथा संचालक, लेखा व कोषागारे,मुंबई ज.र.मेनन, उपाध्यक्ष (DATSWA) महाराष्ट्र राज्य तथा संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा, मुंबई प्रताप मोहिते, माजी कसोटी क्रिकेटपटू जयंतीलाल केनिया, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कोच इम्तियाज खान, रणजी व आयपीएल खेळाडू श्रीदीप मांगेला, सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग तथा विभागीय अध्यक्ष DATSWA कोकण विभाग सीताराम काळे, आदी उपस्थित होते.

गद्रे म्हणाले, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धामधून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कला गुणांना वाव मिळतो. त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळते. खेळातून आपल्याला टीम स्पीरिट,खिलाडूवृत्ती, पराभव स्वीकारण्याची तयारी अशा बऱ्याच गोष्टी शिकता येतात. कार्यक्रमाचे शिस्तबध्दरित्या आयोजन केल्यामुळे आयोजक कोंकण विभागाचे त्यांनी अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर खेळाडूंमार्फत मशालीसह मैदानास प्रदक्षिणा आणि मशालींचे मान्यवरांकडे हस्तांतरण करण्यात आले. त्यानंतर दिवंगत सहकाऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमास कोकण, मुंबई, अधिदान व लेखा कार्यालय, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर असे एकूण 8 विभागातील संघ सहभागी झाले आहेत. राज्यातील कोषागारे, उपकोषागारे, स्थानिक निधी लेखा कार्यालये, आयुक्तालये, संचालनालये, जिल्हाधिकारी कार्यालये, इ. शासकीय कार्यालये, महानगरपालिका, प्राधिकरणे, जिल्हा परिषदा इ. प्रतिनियुक्तीवर असलेले वित्त व लेखा सेवेचे अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom