Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

कचरा टाकण्याच्या वादातून वृद्धावर तलवारीने हल्ला


मुंबई - कचरा टाकण्याच्या वादातून एका 60 वर्षांच्या वयोवृद्धावर गुरुवारी तीनजणांच्या एका टोळीने तलवारीने वार केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली. या हल्ल्यात मोहम्मद मेहंदी सगीर हसन सय्यद हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला असून पळून गेलेल्या तिघांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

ही घटना गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता गोवंडीतील बैंगनवाडी, ममता वेल्फेअर सोसायटीजवळील कमलारामण नगरात घडली. याच ठिकाणी मोहम्मद मेहंदी सय्यद (60) हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. गुरुवारी सकाळी त्यांच्या घरासमोरच तीन तरुणांनी कचरा टाकला होता, हा प्रकार निदर्शनास येताच त्यांच्या मुलीने या तिघांनाही जाब विचारला होता. या कारणावरुन या तिघांनी तिच्याशी भांडण सुरु केले होते. या भांडणात मोहम्मद मेहंदी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या तिघांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या डोक्यावर तलवारीने वार केले तसेच त्यांच्या मुलीला बेदम मारहाण केली. या हल्ल्यानंतर ते तिघेही पळून गेले होते. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी मोहम्मद मेहंदी यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहे. ही माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मोहम्मद मेहंदी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या तिन्ही आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom