महापौर आठवडाभरात राणीबागेत वास्तव्यास जाणार

Anonymous

मुंबई - मुंबईच्या महापौरांच्या बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जाणार आहे. बाळासाहेबांच्या २३ जानेवारी रोजी जयंतीदिनीच स्मारकाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. याकारणाने महापौर बंगला रिकामा करण्याचे काम सुरु झाले आहे. महापौरांची राहण्याची व्यवस्था आता पर्यायी राणीच्या बागेतील उद्यान अधिक्षकांच्या बंगल्यात करण्यात आली आहे. यामुळे येत्या आठवडाभरात महापौर विश्वनाथ महाडेश्वर या बंगल्यात राहायला जाणार आहेत. 

दादर शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सतत ४० वर्ष लाखोंचे दसरा मेळावे झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेत गेली २५ वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. यामुळे गेले २५ वर्ष मुंबईचे महापौर पद शिवसेनेकडे आहे. महापौर बंगल्याला अनेकवेळा बाळासाहेबांनी भेट दिली आहे. या कारणामुळे महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जात आहे. स्मारक बनवण्यासाठी सदर जागा स्मारक ट्रस्टकडे हस्तांतरित झाली असून बाळासाहेबांच्या जयंती दिनी म्हणजेच २३ जानेवारीला स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आधी महापौरांना बंगला रिकामा करावा लागणार आहे.
दादर शिवाजी पार्क येथील महापौर बंगला सोडल्यावर पर्यायी निवासस्थान म्हणून राणीबागेतील बंगला महापौरांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. या बंगल्याला नुकतीच महापौरांनी आपल्या कुटुंबासह भेट दिली होती. या भेटी दरम्यान महापौर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बंगल्यात काही सुधारणा सुचवल्या होत्या. या सुधारणा करून बंगला १५ दिवसात तयार ठेवा असे आदेश महापौर महाडेश्वर यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले होते. राणीबागेतील बंगल्यातील रंगरंगोटी आणि सुधारणा करून बंगला तयार झाल्याने तसेच येत्या २३ जानेवारीला स्मारकाचे भूमिपूजन होऊ शकते. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथील बंगल्यातील सामान राणीबागेतील बंगल्यात हलवण्याचे काम गुरुवारपासून सुरु झाले असून आठवडाभरात महापौर आपल्या कुटुंबासह राणीबागेतील नव्या बंगल्यात राहण्यास जाणार आहेत.
Tags