Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

‘एसटी’ची आता मालवाहतूक आणि गोदामेही - परिवहनमंत्री

मुंबई, दि. 3 : एसटी महामंडळ आता मालवाहतूक सेवा सुरु करणार असून गोदामांच्या व्यवसायातही महामंडळ उतरणार आहे. महामंडळाचे उत्पन्न वाढविणे आणि त्याचबरोबर नागरिकांना विविध सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कल्पक उपाययोजना सध्या राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून स्वतंत्र वाहनांद्वारे मालवाहतूक करणे, विनावापर पडून असलेल्या जागांवर 301 गोदामांची निर्मिती करणे आदींबाबत आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सादरीकरण करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार एसटीची मालवाहतूक आणि गोदामांची सेवा लवकरच सुरु करण्यात येईल, असे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले.

महामंडळाने प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या मालवाहतुकीच्या तरतुदीचा आता वापर करण्याचा निर्णय मंत्री रावते यांनी घेतला आहे. त्याआधारे रेल्वे मालवाहतुकीच्या धर्तीवर आता एसटीचीही मालवाहतूक सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. मालवाहतुकीमुळे रेल्वे मोठ्या प्रमाणात फायद्यात आहे.

मालवाहतूक सेवेसाठी स्वतंत्र वाहने वापरण्यात येणार आहेत. सध्याच्या वापरातील प्रवासी वाहनांचे 9 वर्षानंतर सर्व तांत्रिक बाबी पडताळून मालवाहतूक वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येईल. त्यास परिवहन विभागाची रितसर मान्यता घेण्यात येईल. त्यानंतर ही वाहने मालवाहतुकीसाठी वापरण्यात येतील. कृषी माल, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, व्यापारी माल, स्टेशनरी आदी सर्व प्रकारच्या मान्यताप्राप्त मालाची वाहतूक करण्यात येईल. विशेष करुन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा माल शहरी बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याच्या कामी या सेवेचा वापर करण्यात येईल, असे मंत्री रावते यांना सांगितले. याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनीने आज सादरीकरण केले. त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावात काही सुधारणा सुचविण्यात आल्या असून हा प्रस्ताव लवकरच अंतिम करण्यात येईल. या सेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी यांना व्यापारी लूट थांबून किफायतशीर दरात हक्काचे मालवाहतूक साधन मिळेल, असे मंत्री रावते म्हणाले.

महामंडळाच्या मालवाहतूक सेवेत रेशन धान्य, पोषण आहाराचे धान्य आदींची वाहतूक करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी महामंडळाच्या साधारण 3 हजार जुन्या प्रवासी बसेसचे मालवाहतूक वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येईल. काही नवीन मालवाहतूक वाहने खरेदी करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.

आज झालेल्या सादरीकरणात राज्यातील 301 ठिकाणी गोदामे बांधता येऊ शकतील असे सांगण्यात आले. 3 टप्प्यांमध्ये या गोदामांची बांधणी करुन ती लोकांसाठी आणि विशेषत: शेतकऱ्यांच्या मालाच्या साठवणुकीसाठी उपलब्ध करुन देण्याचा एसटी महामंडळाचा मानस आहे.

मालवाहतूक आणि गोदामे यांचे संनियंत्रण करण्यासाठी महामंडळात सहव्यवस्थापकीय संचालक हे नवीन पद निर्माण करण्यात येणार असून स्वतंत्र विभाग आणि स्वतंत्र कर्मचारी वर्गही नियुक्त करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

बैठकीस मंत्री रावते यांच्यासह महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, महामंडळाचे अधिकारी अशोक फळणीकर, माधव काळे, पवनीकर, जवंजाळ, संजय गांजवे, सल्लागार कंपनीचे अधिकारी अमित पटजोशी, विवेक कुमार, रोहीत चतुर्वेदी आदी उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom