
मुंबई - बेस्ट उपक्रमाचे विलिनीकरण, घरांचा प्रश्न, सानुगृह अनुदान, मास्टर ग्रेट आदी प्रलंबित मागण्यांबाबत बेस्ट कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेनेही संपाला पाठिंबा दिल्याने १०० टक्के संप यशस्वी होणार आहे. या संपामुळे मुंबईकरांना वेठीस धरले जाणार आहे.
बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिकेत समाविष्ट करावा, मागणी पत्रावर चर्चा करावी, वेतन करार, निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी, मार्च २०१६ मध्ये वेतन करार संपला तो करार पुन्हा करावा, दिवाळी पूर्वी जाहीर केलेले ५,५०० रुपये सानुग्रह अनुदान, कर्मचाऱ्यांना निवासस्थानाचा प्रश्न अशा विविध मागण्या बेस्ट उपक्रमाकडे प्रलंबित आहे. उपक्रमाकडे पाठपुरावा करुनही दुर्लक्ष केले जात आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी यामुळे ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे. शिवसेनेनेही संपाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी कुलाबा बेस्ट भवन येथे बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संपाची भूमिका कृती समितीने जाहीर केली आहे, अशी माहिती बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शंशाक राव यांनी दिली.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. या मागण्य मान्य व्हायला हव्यात. शिवसेना कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे. बेस्ट अर्थसंकल्प पालिकेत विलिनीकरणाचा ऑक्टोबर २०१७ मंजूर केला. मात्र, तो प्रस्ताव पालिका आयुक्तांनी अद्याप राज्य सरकारकडे पाठवला नाही. ते कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत, असा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला.