उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतरही बेस्ट संपाचा तिढा कायम - चर्चा निष्फळ


मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपावर गुरुवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीत सात तास झालेल्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतरही तोडगा निघाला नाही. त्यामुळे तिस-या दिवसानंतरही संप सुरुच ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. 

बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, ज्युनिअर ग्रेड बदलून त्यांची वेतन निश्चिती पूर्वलक्षी प्रभावाने मास्टर ग्रेडमध्ये करावी, मार्च २०१६ मध्ये संपलेला वेतन करार पुन्हा करावा आदी प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातील सुमारे ३० हजार कामगार मंगळवारपासून संपावर गेले होते. संप बेकायदेशीर ठरवून प्रशासनाने कर्मचा-यांना मेस्मा कायद्याअंतर्गत निवासस्थानेही रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या. मात्र तरीही कर्मचारी संपावर ठाम राहिले. कारवाई विरोधात कर्मचा-यांच्या कुटुंबीयांनी वडाळा आगारावर मोर्चा काढून आंदोलन केले. संप चिघळत असल्याच्या लक्षात आल्यानंतर दिवसभर चर्चेचे गु-हाळ सुरू झाले. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपावर तोडगा काढण्यासाठी दुपारपासून महापौर, पालिका आयुक्त, बेस्ट महाव्यवस्थापक तसेच कृती समिती यांच्यासोबत बैठक आयोजित करून चर्चा सुरु केली. रात्री उशिरापर्यंत मॅरेथॅान बैठक सुरु राहिली मात्र बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. अर्थसंकल्पाच्या विलिनीकरणाला स्पष्टपणे नकार देण्यात आला. ग्रेड पे वर कोणत्याही सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही. मागण्यांबाबत पालिका आयुक्त व बेस्ट प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिले जात नसल्याने कृती समिती बैठकीतून बाहेर पडली. लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही यावर ठाम राहून शुक्रवारी चौथ्या दिवशीही संप सुरुच ठेवण्याचा निर्णय कृती समितीने जाहिर केला आहे. शुक्रवारी कामगारांचा मेळावा घेऊन त्यामध्ये संपाबाबत कामगारच काय तो निर्णय घेतील असे कृती समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत महापौर बंगल्यावर झालेल्या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री सुभाष देसाई, कामगार नेते शशांक राव, पालिका आयुक्त अजोय मेहता, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

तीन दिवसांत ९ कोटींचा तोटा -
बेस्ट आर्थिक तोट्यात आहेत. बेस्टचा तोटा भरुन काढण्यासाठी महापालिकेने मदत द्यावी, अशी मागणी केली जात असताना कामगारांनी केलेल्या तीन दिवशीय संपामुळे बेस्ट परिवहन विभागाला तब्बल ९ कोटी रुपयांचा तोटा झाला. तर १० बसगाड्यांची तोडफोड करुन बसचे नुकसान करण्यात आले. यात एक बस चालक जखमी झाल्याची माहिती बेस्ट परिवहन विभागाने दिली. 
 
दिवसभरात काय झाले-
सकाळी ९ वाजता - संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट भवनात बेस्ट महाव्यवस्थापकांसोबत युनियनची बैठक, तोडगा नाही.
- शशांक राव यांचा वडाळा बस आगारावर कर्मचारी कुटुंबातर्फे मोर्चा काढण्याचा इशारा.
सकाळी ९:४८ वाजता - बेस्ट संपाला मनसेचा पाठिंबा
११ वाजता -- कृष्णकुंजवर राज ठाकरेची भेट. कृती समितीची बैठक.
- नितेश राणे यांचा बेस्ट कर्मचाऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा. वडाळा आगारात दाखल.
दुपारी १२ वाजता - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा वडाळा आगारासमोर आंदोलन.
दुपारी १ वाजता: संपावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयातून हालचाली. आयुक्त, महाव्यवस्थापक आणि मुख्य सचिव यांची बैठक.
४ वाजता - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महापौर बंगल्यावर दाखल.
५:३० वाजता - महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांच्यात बैठक.
६:५८ वाजता - मुंबई मनपाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा बेस्ट संपाला पाठिंबा; मागण्या मान्य न झाल्यास संपात सहभागी होणार.
८ वाजता - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीवेळी शिवसेनाप्रणित संघटनेला बैठकीपासून ठेवले लांब.
Tags