बेस्ट संपात फूट, शिवसेनेची माघार


मुंबई - बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप दिवसभरात १०० टक्के यशस्वी झाला असताना रात्री शिवसेनेने संपाला दिलेला नैतिक पाठिंबा काढून घेतल्याने संपात फूट पडली आहे. शिवसेना बुधवारी पहाटेपासून ५०० बसेस रस्त्यावर उतरवणार असल्याचे जाहिर केले आहे. मात्र कृती समिती संपावर ठाम राहिल्याने संघटनांमध्ये राडा होण्याची शक्यता आहे.

बेस्ट कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने सोेमवारी मध्यरात्रीपासून कामगार संघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे. ३ हजार २०० बसेसमधील एकही बस रस्त्यावर धावली नसल्याने मुंबईकरांचे हाल झाले. या पार्श्वभूमीवर दुपारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासोबत कामगार संघटनांची बैठक पार पडली. मात्र चर्चा फिसकटल्याने कामगार संघटना संपावर ठाम राहिल्या आहेत. नितेश राणे यांच्या समर्थ कामगार संघटनेनेही संपाला पाठिंबा जाहिर केला. त्यामुळे संप सुरुच ठेवण्याचा निर्णय कामगार संघटनांनी घेतला. दुपारच्या बैठकीनंतर संघटनांमध्ये श्रेय घेण्याची धडपडही संघटनांमध्ये दिसून आली. शिवाय पालिका आयुक्तांनीही आधी संप मागे घ्या, नंतरच चर्चा केली जाईल अशी कठोर भूमिका घेतल्याने संपावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शिवसेनेने त्यानंतर नरमाईची भूमिका घेऊन रात्री पुन्हा पालिका आयुक्तांसोबत बैठक बोलावली. मात्र आयुक्तांची भूमिका कायम राहिल्याने शिवसेनेने संपाला दिलेला पाठिंबा मागे घेत असल्याचे जाहिर केले. उद्या शिवसेना ५०० बसेस रस्त्यावर उतरवणार असल्याने संपात फूट पडणार हे निश्चित आहे. मात्र नितेश राणे यांच्या संघटनेनेही संपात उडी घेतल्याने बुधवारी राडा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

प्रशासन बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दल चर्चा करण्यास तयार असल्याने संपातून माघार घेत असल्याचे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले. 'प्रशासन आधी मागण्यांवर चर्चा करायला तयार नव्हते. आता लवकरच सुधारित वेतन, बोनस आणि बेस्टचे महापालिकेत विलिनीकरणावर चर्चा करण्यास आयुक्त, महाव्यवस्थापक तयार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे अधिक हाल होऊ नये, यासाठी संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतला', अशी माहिती त्यांनी दिली. तसेच बेस्ट कामगार सेनेचे सभासद सकाळपासून कामावर हजर होतील, असेही त्यांनी म्हटले.
Tags