डेबिट, क्रेडिट कार्डसाठी आता टोकन क्रमांक

Anonymous

बंगळुरू - क्रेडिट आणि डेबिट कार्डाचा वापर केल्यामुळे कोणतंही पेमेंट करताना सोयीचं होत असलं तरी या कार्डांची जोखीमही खूप असते. कार्डाचा कोणी दुरुपयोग केला तर? पासवर्ड हॅक झाला तर? अशा शंका-कुशंकांमुळे आपण कार्ड डेटा वेबसाइटवर सेव्ह करणं टाळतो.

म्हणूनच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कार्ड क्रमांकाऐवजी 16 अंकी टोकन जारी करणार आहे. कार्डाच्या मूळ क्रमांकाऐवजी बँकांनी दिलेले हे टोकन क्रमांक आपण वापरू शकतो. हे टोकन प्रत्येक व्यवहारानंतर बदलण्यात येतं त्यामुळे टोकन क्रमांकाचा वापर खूपच सुरक्षित आहे.

या नव्या नियमामुळे विदेशवारी करणार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. थायलंडसारख्या देशाच्या पर्यटनावर जाणार्‍या पर्यटकांना या कार्डांबाबत खूप काळजी घ्यावी लागते. तेथील कार्ड-स्कीमिंग सिंडिकेट्स खूप सक्रीय आहेत. अनेकदा विदेशी संकेतस्थळांवरून काही ऑर्डर केल्या काही संकेतस्थळांवर भारतीय संकेतस्थळांप्रमाणे टू-फॅक्टर-ऑथेन्टिकेशन अनिवार्य नसतं.

कार्ड क्रमांकाऐवजी टोकन क्रमांक आल्यास डिजीटल पेमेंट्सला चालना मिळेल. हे टोकन क्रमांक खूपच उच्च सुरक्षा मानकांसह जारी केले जातात. फायनान्शिअल टेक्नॉलॉजी कंपनी एफएसएसचे पेमेंट्स प्रमुख सुरेश राजगोपालन म्हणाले की, ’एकदा टोकन मिळाला की तो क्रमांक कार्ड होल्डरशिवाय दुसर्‍या कोणालाही कळत नाही. कार्ड जारी करणार्‍या बँक कर्मचार्‍यालाही हा क्रमांक माहित नसतो.’