बेस्ट संप - विरोधकांचा स्थायी समितीमधून सभात्याग


मुंबई - बेस्ट संपावर स्थायी समितीत चर्चा करू न दिल्याने विरोधी पक्षाने बुधवारी सभात्याग करून स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. बेस्टचा संप जनता झाली त्रस्त, सत्ताधारी तुपाशी बेस्ट कामगार उपाशी अशा घोषणांचे फलक घेऊन विरोधकांनी निदर्शने केली.

विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचा-यांचा मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने कामगारांच्या कृती समितीने संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्य़ा कामगार संघटनेने मात्र कोणताही तोडगा निघालेला नसताना संपातून माघार घेतली. दुस-या दिवशी ५०० बसेस रस्त्यावर उतरवण्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा फोल ठरली. संपाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी स्थायी समितीत यावर चर्चा करून सभा तहकूब करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली. मात्र अध्यक्ष य़शवंत जाधव यांनी दुर्लक्ष केल्याने विरोधकांनी सभात्याग केला. विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, सपाचे गटनेते रईस शेख तसेच सदस्य कमलजहॅा सिद्धीकी यांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. हातात सत्ताधा-यांच्या विरोधात फलक घेऊन घोषणाबाजी करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. दालनासमोर बराचवेळ ठिय्या मांडून बसलेल्या विरोधकांसोबत चर्चा करण्यास प्रशासनासह सत्ताधा-यांनीही दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त करण्यात आला. बेस्ट कामगारांच्या संपाबाबत ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय विरोधकांनी घेतल्याने सुरक्षेच्यादृष्टीने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. दालनासमोर आंदोलन करू नये असे सुरक्षा रक्षकांनी सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांनी नकार दिला. अखेर काही तास दालनासमोर निदर्शने केल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बोलावून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर विरोधकांनी आंदोलन मागे घेतले.
Tags