हिंदूराष्ट्र नव्हे सत्ता हेच उद्दीष्ट - कुमार सप्तर्षी


मुंबई - हिंदू राष्ट्र हे उद्दीष्ट नसून सत्ता हेच उद्दीष्ट आहे. हिंदू राष्ट्र निर्माणाचे घोषणा फसवी आहे. ही एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरु आहे, अशी टीका ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपावर केली. 

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आज पत्रकार भवनात पत्रकार दिन साजरा झाला. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते सत्कार झाला. ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांना कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार, सारंग दर्शने यांना जय हिंद पुरस्कार, सतीश खंबाटे यांना विद्याधर गोखळे पुरस्कार, दिपक भातूसे यांना नवसंदेशकार रमेश भोगटे पुरस्कार, अजेयकुमार जाधव यांना अप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार, सौरभ शर्मा यांना शिवनेरकार विश्वनाथ वाबळे शैक्षणिक वार्ता पुरस्कार देण्यात आला. 

राम हा सर्वत्र आणि सर्वव्यापी आहे, असे मानले जाते. मग आयोध्येतच राम मंदीर बांधण्याचा अट्टाहास का केला जात आहे, असा सवाल करीत देशात कुठेही राम मंदीर बांधता येऊ शकते, असे मत सप्तर्षी यांनी मांडले. हिंदू राष्ट्र ही संकल्पना फसवी आहे. ही एकाधिकारशाही निर्माण करण्याचे उद्दीष्ट असल्याचेही ते म्हणाले. धर्म हा माणसाला माणसाशी जोडायला शिकवतो. अधर्म माणसाला माणसापासून तोडतो. देशातील घटनात्मक संस्था उध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राम मंदिराच्या माध्यमातून न्याय व्यवस्था विस्कळीत करण्याचा हेतू आहे. त्यामुळे पत्रकारांनी जबाबदारीने काम करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी लेखिका नयनतारा सेहगल यांच्याविषयी साहित्य महामंडळाने घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी, अजय वैद्य आणि पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Tags