राज्यात स्वाईन फ्लूचे 8 बळी


मुंबई - वातावरणात झालेल्या बदलामुळे राज्यात काही ठिकाणी स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवतोय. आतापर्यंत संपूर्ण महिन्याभरात आठ रूग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी विभागाने पाच कलमी कार्यक्रम राबवावा असं निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत.

“राज्यातील सर्व उपजिल्हा तसंच जिल्हा रूग्णालयात स्वाईन फ्लू उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांनी सर्दी, ताप दोन दिवसांपेक्षा जास्त काळ अंगावर काढू नये. तातडीने डॉक्टरांकडे जाऊन आवश्यक त्या तपासण्या कराव्यात. खाजगी डॉक्टरांनी देखील सर्दी, तापाच्या रूग्णांना दोन दिवसात गोळ्या औषधांनी प्रकृतीत फरक पडला नसल्यास त्यांना स्वाईनचे संशयित रूग्ण समजून ऑसेलटॅमिवीर गोळ्या सुरू कराव्यात. यासंदर्भात शासकीय आरोग्य यंत्रणेला माहिती द्यावी,” असंही आरोग्यमंत्री शिंदे यांनी सांगितलंय. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मदतीने खाजगी डॉक्टरांची कार्यशाळा जिल्हास्तरावर आयोजित करावी. महापालिका क्षेत्रामध्ये आयुक्तांनी जनजागृतीच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवावी. व्हेंटिलेटरवर असलेल्या रूग्णांची माहिती तातडीने कळवावी, असा पाच कलमी कार्यक्रम राबविण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.

हवामान बदलामुळे रुग्णांमध्ये वाढ - सध्या राज्यात सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर थंडी आहे. काही भागात पाऊसदेखील पडला आहे. हे वातावरण स्वाईन फ्लूचे विषाणू फैलावण्यासाठी पोषक असल्याने रूग्ण संख्या वाढतेय. राज्यात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत तर फेब्रुवारी आणि मार्च या काळात रूग्ण आढळून येतात. यावर्षी मात्र जानेवारी महिन्यामध्ये हवामान बदलाचा परिणाम म्हणून स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळून येतायत.”
Tags