550 कोटींचे 59 प्रस्ताव अर्ध्या तासात मंजूर

मुंबई  - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा धसका घेऊन मुंबई महापालिकेत स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीचा धडाकाच लावण्यात आला आहे. या धडाक्यात सभासदांना बोलू न देता मंगळवारी 550 कोटींचे 59 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. आठ दिवसात बाराशे कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. 

गेल्या चार दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत साडेसातशे कोटींचे ८० प्रस्ताव अर्ध्या तासात मंजूर केले. प्रस्ताव मंजूर करताना शिवसेनेची कोंडी करण्याचा सतत प्रयत्न भाजप करीत होता. मात्र निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाची युती झाल्यानंतर शिवसेना भाजपचे नांदा सौख्यभरे सुरू झाले आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपूर्वी विकास कामांचे साडेसातशे कोटींचे ८० पैकी ६२ प्रस्ताव विनाचर्चा मंजूर करण्यात आले. मंगळवारच्या सभेत 70 पैकी 11 प्रस्ताव राखून ठेवण्यात आले, तर हे 59 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यावेळी सभासदांच्या शंकांकडेही अध्यक्ष यशवंत जाधव यांनी लक्ष दिले नाही. अध्यक्षांच्या सुसाट सुटलेल्या गाडीला केवळ नाले आच्छादनाचा प्रस्ताव आणि आनंदीबाई सुर्वे उद्यानाचा विकास या दोन प्रस्तावांच्या चर्चेचा किरकोळ ब्रेक लागला.

सत्ताधारी शिवसेना भाजपाची युती झाल्याने भाजपा पाहरेकरी न राहता भागीदार झाली आहे. विरोधकांना स्थायी समितीमध्ये बोलायला दिले जात नाही. अध्यक्षांची प्रस्ताव मंजूर करण्याची बुलेट ट्रेन सुरू झाली कि थांबतच नाही. ज्या गतीने सत्ताधारी प्रस्ताव मंजूर करत आहेत, त्याच गतीने कामे होत आहेत का याचीही पाहणी सत्ताधाऱ्यांनी करावी. 
- रवी राजा, विरोधी पक्ष नेते 

आम्ही प्रस्ताव बनवत नाही. प्रस्ताव प्रशासन बनवते. सत्ताधारी म्हणून ते तपासून मंजूर करतो. स्थायी समितीमध्ये बोलायला देत नाही हे चुकीचे आहे. प्रस्ताव एकमताने मंजूर होत आहेत.  
- यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष 
Tags