राज ठाकरे ‘राजकीय सर्जिकल स्ट्राइक’च्या तयारीत


मुंबई - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानस्थित ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर एअर स्ट्राइक केल्यानंतर देशात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेही मुंबईत ‘राजकीय सर्जिकल स्ट्राइक’ करण्याच्या तयारीत आहेत. येत्या शनिवारी त्यांची मुंबईत सभा होत असून ते कुणावर शाब्दिक हल्ला चढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या सोशल मीडियावर ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राइक, महाराष्ट्र सैनिकांनो तयार राहा,’ अशा आशयाचे पोस्टर्स व्हायरल झाले आहेत. त्यावर, येत्या शनिवारी, 9 मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे यांची वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सभा होणार आहे, असा उल्लेख आहे. या पोस्टर्सची सध्या चर्चा सुरू असून राज कुणावर राजकीय सर्जिकल स्ट्राइक करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, एअर स्ट्राइक करून ‘जैश’चे तळ उद्ध्वस्त करणार्‍या हवाई दलाचे राज ठाकरे यांनी मनसेच्यावतीने अभिनंदन केले होते. तर कोल्हापूर येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीद हे राजकीय बळी असू शकतात, असा हल्लाबोल करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते.