मुंबईचा विकास हाच शिवसेनेचा ध्यास - महापौर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईचा विकास हाच शिवसेनेचा ध्यास - महापौर

Share This
मुंबई  - मुंबईचा विकास हाच शिवसेनेचा ध्यास आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून शिवसेनेतर्फे अनेक लोकोपयोगी कामे करण्यात येत आहेत आणि त्याकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जातीने लक्ष पुरवीत आहेत. निवडणुका येतात आणि जातात; पण कामाचा प्रवाह सुरूच असतो, असा दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला.

भायखळा येथील वीर जिजामाता उद्यानातील विविध कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केल्यानंतर महाडेश्वर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, महापालिका अधिकाऱ्यांच्या सहकार्याने येथे विविध कामे करण्यात येत आहेत. उद्यानाच्या मूळ जागेत 12 एकर जागेची भर पडली आहे. त्या जागेचा सदुपयोग करून उद्यानाचा कायापालट करण्यात येत आहे.

महाडेश्वर म्हणाले की, सुमारे २००० चौरस मीटर क्षेत्रावर मुंबईतील सर्वात मोठा गांडुळखत प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. ६५७.५२ चौ.मी. क्षेत्रावर काकर पिंजरा बनविण्यात आला आहे. सांबर आणि चितळांसाठी पिंजरे बनविण्यात आले आहेत. प्राण्यांचे शाकाहारी व मांसाहारी खाद्य स्वच्‍छ करून वेगवेगळ्या भागात तयार करण्याकरिता ओटा, मिश्रणटाक्या, डीप फ्रीजर इत्यादींनी सुसज्ज असलेले किचन कॉम्लेक्‍स तयार करण्यात आले आहेत. वाघ, सिंह, बिबट्या या प्राण्यांकरिता क्वारंटाईन क्षेत्र तयार करण्यात आले आहे.
 
प्राणिसंग्रहालयातील इमारतीच्या तळमजल्यावर सुमारे २०५ आसनक्षमता असलेले नवीन थ्रीडी थिएटर विकसित करण्यात आले आहे. या थिएटरमध्ये विविध प्राणी - पक्षांच्या माहितीचे, पर्यावरणाशी संबंधित डिस्कव्हरी, अॅनिमल प्लॅनेट यांचेकडील माहितीपट दाखविले जात आहेत. हे उद्यान म्हणजे पर्यटकांचे खास आकर्षण बनविण्यात येणार आहे. अशा प्रकारची इतर अनेक कामे करण्यात येत आहे. शिवसेनेने विकासाचा ध्यास घेतला असल्यानेच ही कामे होत आहेत, असे महाडेश्वर म्हणाले.

आदित्य ठाकरे यांची पाठ -
वीर जिजामाता भोसले उद्यानातील कार्यक्रमाला आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे मंत्री 12.30 वाजता येणार म्हणून प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. मात्र यांच्यापैकी कोणीही आले नाहीत. फक्त महापौर 2 वाजताच्या सुमारास हजर झाले आणि त्यांनी कार्यक्रम उरकून नेला. त्यामुळे या अगोदरचे फोर्ट आणि कुलाबा येथील कार्यक्रम करताना वाघाचा बछडा थकला अशी कुजबूज सुरू होती.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages