Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

दोन हजाराहून अधिक मतदान केंद्रे वाढवली, राज्यात आता एकूण 97 हजाराहून अधिक केंद्रे


मुंबई दि. 2 : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात नव्याने दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रे वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात एकूण 97 हजार 640 मतदान केंद्रे असणार आहेत. विशेष म्हणजे नाशिकमध्ये 274 वाढीव मतदान केंद्रे, पुण्यामध्ये 237 आणि ठाण्यामध्ये 227 वाढीव मतदान केंद्रे असणार आहेत. मात्र सिंधुदुर्गमध्ये एकही वाढीव मतदान केंद्र नसेल.

साधारणपणे 1 हजार 400 मतदारांमागे 1 मतदान केंद्र असण्याचे प्रमाण आहे. गेल्या काही दिवसात मतदारांना नाव नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये मतदारांची वाढ झाल्याचे दिसून आल्याने मतदान केंद्राचीही वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी यापूर्वी 95 हजार 473 मतदान केंद्रे स्थापन करण्याचे नियोजन होते. आता मात्र मतदारांची संख्या वाढली असल्याने नव्याने 2 हजार 167 मतदान केंद्रे राज्यभरात वाढविण्यात आली आहेत. आता एकूण 97 हजार 640 मतदान केंद्रे असणार आहेत. 2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदार केंद्रे होती. तर 2009 मध्ये एकूण 83 हजार 986मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2014 मध्ये एकूण 91 हजार 329 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीमध्ये 97हजार 640 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.

मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे,मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिध्दी,संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदार केंद्रांची 'संवेदनशीलता' बघून त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते. केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 15 प्रकारच्या मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom