मुंबईच्या विकासासाठी केंद्राकडून १४ लाख कोटींचे विशेष पॅकेज आणणार - राहुल शेवाळे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 April 2019

मुंबईच्या विकासासाठी केंद्राकडून १४ लाख कोटींचे विशेष पॅकेज आणणार - राहुल शेवाळे


मुंबई - मुंबईच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्राकडून १४ लाख ६०० कोटींचे विशेष पॅकेज पुढील पाच वर्षात आणणार, अशी ग्वाही युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी दिली. ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’च्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. 

मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी कोणतीही मोठी गोष्ट न करता केवळ मुंबई विकास आराखड्याची १०० टक्के अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. गेल्या वेळेस जो विकास आराखडा मंजूर झाला होता, त्यातील केवळ ७ टक्के आराखड्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली. जगातील कोणत्याही देशात विकास आराखड्याची इतकी अल्प अंमलबजावणी होत नाही. यंदाचा विकास आराखडा तयार झाला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी १४ लाख ६०० कोटींच्या निधीची गरज आहे. मात्र, मुंबई महापालिकेला इतका अवाढव्य खर्च शक्य नसल्याने पालिकेने यासाठी केवळ ३४०० कोटींची तरतूद केली आहे. या वेगाने आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी तब्बल १०० वर्षांचा अवधी लागेल. म्हणून या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज द्यायला हवे, केंद्र सरकारने मुंबईच्या विकास आराखड्याला निधी दिला तर ती त्यांची गुंतवणूक होईल. त्यातून केंद्र सरकारलाही मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळू शकेल, त्यामुळे आपण निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले. तसेच आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका या तीनही आस्थापनांनी समन्वय साधणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीत दक्षिण- मध्य मुंबई मतदार संघातून राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. याबाबत, पत्रकारांनी शेवाळे यांना पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आल्यावर आपण कोणत्या कामाला प्राधान्य द्याल? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ते बोलत होते. पत्रकारसंघात आयोजित करण्यात आलेल्या या वार्तालापापुर्वी अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी शेवाळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कोषाध्यक्ष मंगेश नरवडेकर, कार्यकारिणी सदस्या स्वाती घोसाळकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

Post Bottom Ad