राहुल शेवाळेंविरोधात काँग्रेसचे ‘क्या हुआ तेरा वादा’ आंदोलन


मुंबई - मोदी सरकारने घिसाडघाईने घेतलेल्या नोटबंदी आणि जीएसटी सारख्या निर्णयामुळे धारावीतील चर्मोद्योग आणि कपड्यांच्या व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले असून त्यापैकी अर्ध्याहून अधिक उद्योग आर्थिक संकटात सापडून बंद पडले. एवढे सगळे होत असताना या मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे मात्र संसदेत मूग गिळून गप्प बसले होते, असा आरोप दक्षिण मध्य मुंबईतील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी केला आहे. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक खासदार आणि सरकारच्या या निष्क्रीयतेचा जाब विचारण्यासाठी काँग्रेसने ‘क्या हुवा तेरा वादा’ नावाची अनोखी प्रचार मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आता जेव्हा राहुल शेवाळे जेव्हा मतदारसंघात दिसतील तेव्हा इथला मतदार त्यांना ‘क्या हुआ तेरा वादा’ असा सवाल करेल, असेही गायकवाड म्हणाले. 

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मिलींद देवरा, दक्षिण मध्यमुंबईतील उमेदवार एकनाथराव गायकवाड आणि आमदार वर्षा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून काँग्रेसने ‘क्या हुवा तेरा वादा’ या अनोख्या प्रचार मोहिमेची सुरूवात केली. यावेळी ‘क्या हुवा तेरा वादा’ या प्रश्नाचा उल्लेख असलेले स्टीकर्सही वाटण्यात आले. मतदारसंघातील घरे, भींती आणि ऑटोरिक्षांसह जागोजागी हे स्टिकर्स लावण्यात येणार आहेत.

याबाबत बोलताना एकनाथराव गायकवाड म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी धारावीकरांच्या तोंडाला फक्त पानेच पुसली. धारावीच्या पुनर्विकासाच्या घोषणा झाल्या. धारावीला इंडस्ट्रीयल हब बनवण्याचीफक्त स्वप्ने दाखवली गेली. या घोषणा हे वादे प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न मात्र झालेच नाहीत. नोटबंदी आणि घिसाडघाईने राबवलेल्या जीएसटीसारख्या निर्णयामुळे धारावीतील लघुउद्योगांपैकी जवळपास पन्नास टक्के उद्योगबंद पडले. उर्वरीत उद्योगही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जागतिक स्तरावर मान्यता मिळवलेला धारावीचा चर्मोद्योग व कपड्यांच्या व्यवसायाला या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसला. हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसतअसतानाही शिवसेनेचे स्थानिक खासदार राहुल शेवाळे मात्र संसदेत मूग गिळून गप्प बसून होते.संपुर्ण पाच वर्षात याबाबत एकही प्रश्न त्यांनी संसदेत विचारला नाही. किंवा धारावीत येऊन अडचणीत सापडलेल्या उद्योजकांशी त्यांनीसाधी चर्चाही केली नाही. याचा राग धारावीकरांच्या मनात आहे. आणि या रागालाच आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून वाट करून दिल्याचे त्यांनी सांगितले.