राज्यात 'मतदार जागरुक मंच'ची स्थापना - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

10 April 2019

राज्यात 'मतदार जागरुक मंच'ची स्थापना

मुंबई, दि. १० : मतदारांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देणे, मतदानाचे महत्त्व पटवून देणे यासाठी राज्यात 'मतदार जागरुक मंच' स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये १८ हजारांहून अधिक व्यक्तींना मतदानाविषयी विविध माध्यमातून जागृती करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

हा मंच चार वेगवेगळ्या टप्प्यामध्ये काम करत आहे. 'मतदान पाठशाळा' याअंतर्गत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ९ हजार ६०३ व्यक्तींना याबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सध्या नववी ते बारावीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी आणि भावी मतदार असलेले, नवीन मतदार यांच्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याशिवाय औपचारिक शिक्षण प्रवाहाच्या बाहेर असलेल्या मतदारांसाठीही 'मतदान पाठशाळा' आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये शाळांमध्ये मतदान जागृती करण्यात येत असून ५ हजार ३५० व्यक्ती मतदानाचे महत्त्व समजावून सांगत आहेत.

यावेळी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करणाऱ्या नवमतदारांना मतदानाच्या हक्काबाबत सजग करण्यासाठी विविध महाविद्यालयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून यासाठी २ हजार ४८६ व्यक्ती हे काम करीत आहेत. मतदार जागरुक मंचाच्या (वोटर अवेरनेस फोरम) माध्यमातून जवळपास १ हजार २२१ व्यक्ती काम करीत असून शासकीय-निम शासकीय कार्यालये, पंचायत समिती, स्वयंसेवी संस्थामध्ये काम करणाऱ्या अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे यासाठी या व्यक्ती प्रयत्न करत आहेत.

राज्यामध्ये निवडणूक साक्षरता वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक घटकांमध्ये 'निवडणूक साक्षरता क्लब' (ELC) स्थापन करण्यात आले आहेत. सामान्य नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी संभाव्य मतदार, नवीन मतदार, निवडणूक पाठशाळा व मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना भारत निवडणूक आयोगामार्फत कळविण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जागरूकता मंच स्थापन करण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, शाळा, समाजमाध्यमे, चित्रपटगृहे, डिजिटल होर्डिंग, रुग्णालये आणि चुनाव पाठशाळा अशा माध्यमांतून अधिकाधिक मतदान होण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, बँका, सहकारी संस्थांमध्ये संबंधित कार्यालयाच्या प्रमुखांना समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून या कार्यालयांमध्ये मतदान जनजागृतीसाठी बैठका, चर्चासत्रे, शपथ ग्रहण असे विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.

'मतदार जागरुक मंचाच्या' माध्यमातून मतदान जागृती करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची ओळख, नितीमत्तापूर्ण मतदान, पथनाट्य फेरी, मानवी साखळी, मतदान घोषवाक्यांची फलक फेरी, फ्लॅश मॉब याबरोबरच समाजमाध्यमांचाही प्रभावीरित्या उपयोग केला जात आहे.

Post Top Ad

test