गोरेगावमधील रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक फास्टट्रकवर

Anonymous

मुंबई - गोरेगाव रेल्वे स्थानकाबाहेरील गुरांच्या बाजारालगत मोठी वाहतूक कोंडी होत होती. महापालिकेने ही बाब विचारात घेऊन येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनानेही या रस्ता रुंदीकरणास हिरवा कंदील दिल्याने येथील वाहतूक फास्ट ट्रकवर येणार आहे.

गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला औद्योगिक वसाहती, फिल्मसिटी, नागरी निवारा, आरे कॉलनी आदी परिसर आहे. कामांनिमित्ताने येणाऱ्या मुंबईकरांची मोठी संख्या आहे. परंतु, रस्ता अरुंद असल्याने येथून वाट काढताना मुंबईकरांना दिव्य संकट पार करावे लागते. वाहनांच्या रांगा लागतात. महापालिकेने ही वाहतूक कोंडी फोडण्याचा निर्णय घेतला आहे. गोरेगाव रेल्वे स्टेशन पूर्वेकडील भूभाग क्रमांक ३९ वर शासकीय गुरांचा बाजार आहे. महापालिका विकास आराखड्यात या जागेवर १८.३० मीटर रुंदीच्या रस्त्याचे आरक्षण टाकले. मात्र, जागा हस्तांतरणाचा प्रश्न रखडल्याने वाहतूक कोंडीत भर पडत होती. १३ जून २०१९ रोजी उपनगराचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी शासनाच्या ताब्यातील गुरांचा बाजार ते गोरेगाव सब वे या मार्गावरील प्रस्तावित १८.३० मीटर रुंद व २४० मीटर लांबीच्या जागा हस्तांतरणाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यानंतर सुमारे २३६० चौरस मीटरच्या जागेचा ताबा मुंबई महापालिकेला दिला. त्यामुळे गोरेगावमधील वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात कमी होऊन रोज हजारो प्रवाश्यांना आणि विशेषकरून गोरेगाव, जोगेश्वरी व दिंडोशी विधानसभेतील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Tags