Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

महाराष्ट्र पोलिसांची गत पाच वर्षातील कामगिरी उत्कृष्टच - मुख्यमंत्री


मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा देशात चांगली आहे. ही प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी, तिच्या लौकिकात आणखी भर घालणारी कामगिरी व्हावी, यासाठी शासन पोलीस विभागाच्या पाठिशी पूर्ण ताकदीने उभे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. गत पाच वर्षातील महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी उत्कृष्ट अशीच राहिली असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. राज्याच्या पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव अजोय मेहता, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्याचे पोलीस दल हे मोठी क्षमता असलेले देशातील एकमेव असे आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षातील अनुभव पाहता, या दलाने आपल्या सतर्कतेमुळे आणि सजगतेतून अनेक अप्रिय घटना टाळण्याची मोठी कामगिरी बजावली आहे. संवाद साधून अनेक गोष्टी साध्य करता येतात हे सिद्ध केले आहे. आता कायदा आणि सुव्यवस्था राखायची आणि सेवा द्यायचे कर्तव्य पार पाडावे लागते. त्यामुळे शासक नव्हे तर सेवक म्हणून काम करावे लागेल. हा बदल स्वीकारून लोकाभिमुखता वाढवावी लागेल. सामान्य नागरिक,लोकप्रतिनिधींशी संवाद साधूनच अनेक गोष्टी साध्य करता येतात, हे ध्यानात घ्यावे लागेल. आपल्या सोबतच्या आणि हाताखाली काम करणाऱ्यांना आपल्या वागण्यातून आणि सुसंवादातून चांगल्या कामांसाठी प्रवृत्त करावे लागेल. गत पाच वर्षात पोलिसांच्या अधिकारांचे मोठ्या प्रमाणात विकेंद्रीकरण केले. या अधिकाराबरोबरच मोठी जबाबदारी येते. याचे भान ठेवून योग्य वापर करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढते आहे. पण किरकोळ गुन्ह्यातील मुद्देमाल परत करण्याची कार्यपद्धती निर्माण करावी लागेल. यामुळे सामान्य माणसांमध्ये विश्वास निर्माण करता येईल. कोणत्याही परिस्थितीत पोलिसांची प्रतिमा मलीन होऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठीच तंत्रज्ञानाचा आग्रह धरला जातो आहे. तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता येते आणि विश्वासार्हता वाढीस लागते.

आगामी काळातील सण, उत्सवात आणि तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे काही अनिष्ट घटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांच्यावर जरब बसविण्यात यावी. सण, उत्सव शातंतेत आणि सुव्यवस्थेत पार पडावेत यासाठी विविध घटकांशी सुसंवाद वाढवावा. लोकांमध्ये सुरक्षेच्या उपायांबाबत विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, पोलिसांच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. विपरीत परिस्थितीत आणि आव्हानांना तोंड देत काम करणाऱ्या पोलिसांच्या पाठिशी शासन पूर्ण ताकदीने उभे आहे. त्यामुळे या दलाच्या सुधारणांच्या आणि कल्याणाच्या प्रस्तावांवर तात्काळ आणि सकारात्मक निर्णय वेळोवेळी घेण्यात आले आहेत. त्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom