ताज हॉटेलजवळील इमारतीला आग - एकाचा मृत्यू

Anonymous
मुंबई - मुंबईतील ताजमहाल हॉटेलच्या बाजूला असलेल्या चर्चिल चेंबर या पाच मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीच्या धुराचे लोट संपूर्ण इमारतीत पसरल्याने अनेकजण अडकले. अग्निशमन दलाला शर्तीच्या प्रयत्नानंतर अडकलेल्या १४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. 

कुलाबा येथील चर्चिल चेंबर या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर दुपारी १२ वाजून १७ मिनिटांनी अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली. इमारतीत लाकडी सामान असल्याने आग अधिक भडकली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम सुरू केले. तिसऱ्या मजल्यावर लागलेली ही आग क्षणात पसरल्याने इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला. १४ जणांना बाहेर पडता न आल्याने ते आत अडकले. यावेळी रस्त्यावर वाहनांची गर्दी नसल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत पोहचुन बचावकार्य सुरू केले. त्यामुळे मोठी हानी टळली. शर्तीच्या प्रयत्नांनंतर अडकलेल्याना सुखरूप बाहेर काढण्यात दलाला यश आले. जखमी झालेल्या दोघांना तात्काळ जीटी व बाँबे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात श्याम अय्यर (५४) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर युसुफ पुनावाला (५०) हा गंभीर जखमी असून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातुन देण्यात आली. दरम्यान, आग दोन तासानंतर आटोक्यात आली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नसून अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
Tags