गरजू रुग्‍णांना महापौर निधीतून आता २५ हजारांपर्यंत आर्थि‍क मदत

Anonymous

मुंबई - दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मुंबई महापालिकेच्‍या वतीने महापौर निधीतून रुग्‍णांना देण्‍यात येणाऱया ५ हजार रुपयांच्‍या आर्थिक मदतीमध्‍ये वाढ करण्‍याचा निर्णय महापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली महापौर निधी समितीच्‍या कार्यकारी समिती सभेने काल (दि.२९ जुलै २०१९) झालेल्‍या बैठकीत घेतला असून आता १५ ते २५ हजारांपर्यंत आर्थिंक मदत देण्‍यात येणार असल्‍याची माहिती महापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी दिली.

बैठकीला स्‍थायी समिती अध्‍यक्ष यशवंत जाधव, सुधार समिती अध्‍यक्ष सदानंद परब, शिक्षण समिती अध्‍यक्षा अंजली नाईक, समितीचे सचिव तथा महापालिका चिटणीस प्रकाश जेकटे, माजी नगरसेवक बलदेवसिंग मानकू, सदस्‍य बी.एन. कांबळे, दि इन्‍स्टियुट ऑफ चाटर्ड अंकाऊटंन्‍स ऑफ इंडियाच्‍या प्रीती चावला, उप प्रमुख लेखापाल पवार उपस्थितीत होते.

महापौर निधीतून लाभ मिळण्‍यासाठी कर्करोग, किडणी, ह्दयरोग तसेच डायलेसीसच्‍या उपचारांकरिता रुग्‍णांकडून मोठया संख्‍येने अर्ज येत असतात.आतापर्यंत पाच हजार रुपयांची आर्थिक मदत महापौरांच्‍या निधीतून केली जाते. महापौर निधीत भरघोस वाढ करण्‍यासाठी आणि या निधीचा वापर गरीब गरजू रुग्‍णांना करण्‍यासाठी सर्वपक्षीय लोकप्रति‍नि‍धींनी त्‍यांचे एक महिन्‍यांचे मानधन व महापालिका कर्मचाऱयांनी त्‍यांचे एक दिवसाचे वेतन या महापौर निधीला भेट देण्‍याचे आवाहन महापौरांनी केले होते. त्‍याचप्रमाणे गरजू रुग्‍णांना ५ हजार रुपयांची रक्‍कम फारच कमी असल्‍याने त्‍यात वाढ करणे आवश्‍यक होते, त्‍यानुसारच ही वाढ करण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याचे महापौरांनी सांगितले.

आता ह्दय शस्‍त्रक्रिया तसेच किडणी रोपण या आजारांच्‍या रुग्‍णांना प्रत्‍येकी २५ हजार डायलेसीसच्‍या रुग्‍णांकरिता १५ हजार रुपये आ‍र्थि‍क मदत करण्‍याचा निर्णय या समितीने घेतला असल्‍याची माहिती महापौरांनी दिली. महापौर निधीत वाढ करण्‍यासाठी सदस्‍यांना सूचना करण्‍याचे आवाहन महापौरांनी यावेळी केले. त्‍याप्रसंगी स्‍थायी समिती अध्‍यक्ष यशवंत जाधव यांनी उद्योजक असलेल्‍या नगरसेवकांचा समावेश या समितीमध्‍ये करणे तसेच मनपा क्षेत्रातील मोठमोठया सरकारी व खासगी कंपन्‍यांच्‍या मुख्य अधिकाऱयांचा समावेश सदस्‍य म्‍हणून या समितीमध्‍ये केल्‍यास त्‍यांच्‍याकडून जास्‍तीत जास्‍त सीएसआर फंडातून निधी गोळा होऊ शकेल, अशी सूचना केली.
Tags