पूरबाधितांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्रे


मुंबई, दि. ११ : पूरपरिस्थितीत ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ४८ हजार नागरिकांना हलविण्यात आले असून या पूरबाधित नागरिकांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३२ पथकांसह आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्डची एकूण १०५ बचाव पथके कार्यरत असल्याची माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ५४ तर सांगली जिल्ह्यात ५१ पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे,मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहेत.

राज्यातील १० जिल्ह्यांमधील ४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ४५ हजार तर सांगली जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार नागरिकांचा समावेश आहे.

पूरबाधित जिल्ह्यांमध्ये २२६ बोटींद्वारे नागरिकांना हलविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. बाधीत नागरिकांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी नागरिकांना अत्यावश्यक सोईंसह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पूरपरिस्थितीमध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर,रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ७० तालुके बाधीत झाले आहेत. बाधीत गावांची संख्या ७६१ इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.