Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

गणेशोत्सव - मंडपांच्या परवानग्यांचा गुंता कायम


मुंबई - गणेशोत्सवाला अवघे १५ दिवस उरले असतानाही मंडपांच्या ऑनलाईन परवानग्यांसाठी येणा-या अर्जांची संख्या वाढलेली नाही. ११ हजार मंडळांपैकी २६२० मंडळांनी मंडपासाठी अर्ज केले असून आतापर्यंत फक्त १ हजार मंडळांनाच परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अर्ज सादर करण्याची मुदत प्रशासनाने २४ ऑगस्टपर्यंत पाच दिवस वाढवली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत मंडळांना अर्ज करून मंडपासाठी परवानग्या घ्याव्या लागणार आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दोन वर्षापासून मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन परवानगी दिली जाते. त्यामुळे मंडळांना रांगा लावण्यात जाणारा वेळ वाचतो आहे. मंडळांना परवानगी मिळवण्यात अडचण येऊ नये यासाठी पोलीस, अग्निशमन दल आणि वाहतूक विभागाकडून नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहेत. या यंत्रणा प्रशासनाबरोबर समन्वय ठेवणार आहेत. मुंबईभरात सुमारे ११ हजार सार्वजिनक गणेशोत्सव मंडळे आहेत. मात्र आतापर्यंत फक्त हजार २६२० मंडळांनीच पालिकेकडे अर्ज केले असून १ हजार मंडळांना मंडपासाठी परवानग्या मिळाल्या आहेत. १९ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत आहे. पालिकेकडे येणा-यांचा अर्जांचा वेग कमी असल्याने उरलेल्या १५ दिवसांत सुमारे १० हजार मंडळांना परवानग्या द्याव्या लागणार आहेत. ही मुदत कमी असून सर्व मंडळांना परवानग्या मिळायला हव्यात यासाठी मुदत वाढण्याची मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे मंडळांनी केली होती. महाडेश्वर यांनी मुदत वाढवण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार २४ ऑगस्टपर्यंत आणखी पाच दिवसांची मुदत प्रशासनाकडून वाढवण्यात आली आहे. मंडळांना आपापल्या विभाग कार्यालयात मंडप परवानगीसाठी अर्ज करता येत आहे. अर्ज केल्यानंतर संबंधित विभाग कार्यालयाकडून पोलीस, ट्रॅफिक विभागाकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर मंडळांना परवानग्या दिल्या जात आहेत. मुदत वाढवण्यात आली असली तरी पुढील ८ दिवसांत मंडळांना अर्ज करून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कमी वेळांत परवानग्यांसाठी मंडळांची धावपळ उडणार आहे. सदर ऑनलाइन सुविधा बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या www.mcgm.gov.in या वेब पोर्टलवर मराठी व इंग्रजी या दोन्‍ही भाषांमध्‍ये उपलब्‍ध असणार आहे.
.....
अशी आहे सद्यस्थिती --
- एकूण मंडळे - ११ हजार
- आलेले एकूण अर्ज - २६२०
- छाननी पूर्ण - २१९८
- परवानगी दिल्या - १००५
- परवानगी नाकारल्या - १८९
- कार्यवाही सुरू - १००४

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom