अण्णाभाऊ साठे महामंडळ अपहार - दोषारोपपत्र दाखल करण्यास मान्यता

Anonymous

मुंबई - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या परभणी येथील जिल्हा कार्यालयातून 3 कोटी 65 लाख 57 हजार रुपयांचा अपहार केल्याबद्दल महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम, व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे, व्यवस्थापक सुग्रीव गायकवाड, चंद्रशेखर डोंगरे, कार्यालयीन सहायक व लेखापाल सुषमा कसबे यांच्या विरुद्ध सी.आर.पी.सी. कलम 197 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिपरिषद बैठकीत मान्यता देण्यात आली.

नोंदणीकृत सरकारी कंपनी असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास मातंग समाजाच्या उन्नतीसाठी कर्जपुरवठा व अनुदान यासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे निधी पुरवला जातो. 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2015 या कालावधीत महामंडळाच्या परभणी येथील जिल्हा कार्यालयास 5 कोटी 51 लाख 97 हजार 434 रुपये जमा करण्यात आले होते. या रकमेपैकी 1 कोटी 85 लाख 11 हजार 464 रुपये प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले तर उर्वरित 3 कोटी 65 लाख 57 हजार 886 रुपये महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम, व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे, व्यवस्थापक सुग्रीव गायकवाड, चंद्रशेखर डोंगरे,कार्यालयीन सहायक व लेखापाल सुषमा कसबे यांनी संगनमत करुन सेल्फ धनादेशाद्वारे काढल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार या पाच जणांवर परभणी जिल्ह्यातील नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा-1988 चे कलम 19 अंतर्गत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यास आज मान्यता दिली.