साथीचे आजार उद्भवू नयेत म्हणून घ्यावयाची काळजी - JPN NEWS .in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

11 August 2019

साथीचे आजार उद्भवू नयेत म्हणून घ्यावयाची काळजी


 सातारा - सध्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीमध्ये आणि पूर परिस्थिती निवळल्यानंतर मोठ्या प्रमाणात साथीचे आजार उद्भवण्याचा धोका असतो. अशा स्थितीमध्ये अतिसार, गॅस्ट्रो, काविळ,विषमज्वर, लेप्टोस्पॉयरोसीस आणि ताप या आजारांचा उद्रेक होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

लेप्टोस्पॉयरोसीस हा दूषित पाण्यापासून पसरणारा व लेप्टोस्पायरा या जिवाणूमुळे होणार आजार आहे. या जंतूंचे बरेच सिरो प्रकार आहेत. भारतात लेप्टोस्पॉयरोसीस आजाराचे बरेच रूग्ण सध्या आढळत आहेत. हा रोग प्रामुख्याने अंदमान निकोबार बेटे, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ व तामिळनाडूमध्ये आढळतो.

रोगाच्या प्रसाराची कारणे -
रोगाचा प्रसार मुख्यत: रोगबाधित प्राणी (उंदीर, डुकर, गाई, म्हशी व कुत्री) यांच्या लघवीवाटे हे जंतू बाहेर पडतात.
या प्राण्यांच्या लघवीने दूषित झालेले पाणी, माती, भाज्या यांचा माणसाच्या त्वचेशी संपर्क आल्यास तसेच त्वचेवर जखमा असल्यास हा रोग होऊ शकतो.
लेप्टोस्पॉयरोसीस या रोगाचा अधिशयन काळ 7 ते 12 दिवसांचा असतो.

रोगाची लक्षणे -
या रोगामध्ये तीव्र ताप, अंगदूखी, स्नायूदुखी (विशेषत: पाठीचा खालील भाग व पोटऱ्या दुखणे), डोळे लालसर होणे, तीव्र डोकेदुखी इ. लक्षणे दिसून येतात.
काही रुग्णांमध्ये कावीळ, धाप लागणे, खोकल्याद्वारे रक्त पडणे,लघवी कमी होणे अशी लक्षणे आढळू शकतात.
गंभीर स्वरुप धारण केल्यास रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो.

रोगावर इलाज -
माणसाचे रक्त व लघवी यामध्ये हे जंतू सापडतात.
या रोगाच्या निदानासाठी शासकीय रुग्णालयामध्ये सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
गरजेप्रमाणे नागरिकांनी स्वत:ची तपासणी या यंत्रणामार्फत करुन घ्यावी.
लेप्टोस्पॉयरोसीस ग्रस्त रुग्णाला डॉक्सीसायक्लीन, ॲमॉक्सीलीन,ॲम्पीसिलीन ही अत्यंत प्रभावी औषधे शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.
या औषधांमुळे हा आजार पूर्णपणे बरा होतो.

घ्यावयाची काळजी...
या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शेती व पशुसंवर्धन खाते यांनी पुढाकार घेऊन आजारी जनावरांना उपचार करुन ती बरी करणे, त्यांना स्वतंत्र ठेवणे व अशा प्राण्यांच्या लघवीचा मानवी संपर्क टाळून रोग प्रसार थांबविणे महत्वाचे आहे.
तसेच शेतीत काम करणाऱ्यांनी हात मोजे व चिखलात वापरावयाच्या बुटांचा वापर करावा.
शेती कामानंतर हात-पाय गरम पाण्याने स्वच्छ धुवावेत.
दुषित पाण्यावर वाढलेल्या पालेभाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. उंदरांची बीळे बुजवावीत.
गाई गुरांच्या गोठ्यांची स्वच्छता राखावी.
हातापयावरील जखमांवर जंतूविरोधी क्रीम लावावे.
तापावर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा.
पिण्याचे पाणी उकळूनच व गाळून प्यावे.
शक्य नसल्यास तुरटी फिरवून ते पाणी रात्रभर ठेऊन सकाळी त्याचा वापर करावा.
मेडिक्लोरचे 4 थेंब 5 लिटर पाण्यामध्ये टाकून 1 तासानंतरच पाणी पिण्यासाठी वापरावे.

पालिका, ग्रामपंचायत यांनी पिण्याचे पाणी ओ. टी. टेस्ट करुनच नागरिकांना पुरवठा करावा. नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी तुंबलेली गटारे वाहती करावीत,केरकचऱ्याची विल्हेवाट लावावी व कोठेही पाणी तुंबलेल्या अवस्थेत राहू नये जेणेकरुन डास व इतर किटकांचा प्रादुर्भाव वाढणार नाही. निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा होईल याची काळजी नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी घ्यावयाची आहे. यासाठी ब्लिचिंग पावडर, कलोरीन टॅबलेट, लिक्विड क्लोरीन यांचा साठा त्यांचेकडे पुरेशा प्रमाणात राहील याची दक्षता घ्यावी. पूर परिस्थिती निवळल्यानंतर नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच आरोग्य कर्मचारी व आरोग्य पथकांकडून जंतु नाशकांची धुरळणी व फवारणी करण्यात येईल, जेणेकरुन डास व इतर किटकांचा प्रादुर्भाव वाढणार नाही. तसेच घरोघरी भेटी देऊन जलजन्य आजार (उदा. अतिसार, गॅस्ट्रो, काविळ, विषमज्वर व ताप) याबाबत सर्व्हेक्षण करण्यात येईल, याकामी नागरिकांनी सहकार्य करुन स्वत:ची आरोग्य तपासणी करुन घ्यावी.

-डॉ. आमोद गडीकर,
जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

Post Top Ad

test