Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

आरेतील मेट्रो कार डेपोसाठी २२३८ झाडे कापण्याचा प्रस्ताव

मुंबई - मेट्रोच्या कार डेपोसाठी आरेमधील हजारो झाडे कापण्याचा प्रस्ताव मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने वृक्ष प्राधिकरणासमोर ठेवला आहे, मेट्रो प्रकल्पाच्या कार डेपोच्या बांधकामात अडथळा ठरणारी ही झाडे कापण्यास शिवसेनेसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र विरोध होत असल्याने हा प्रस्ताव रखडला आहे. मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला हा झाडे कापण्याचा प्रस्ताव अखेर वृक्ष प्राधिकरणासमोर सादर करण्यात आला आहे. मंगळवारी होणा-या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत संबंधित प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. 

अंधेरी पूर्व येथील आरे वसाहत येथील मेट्रो रेल्वे ३ प्रकल्पांतर्गत मेट्रो कार डेपोच्या प्रस्तावित बांधकामात अडथळा करणारी २२३८ झाडे कापण्यास आणि ४६४ झाडे पुनर्रोपित करण्यास तसेच ९८९ झाडे आहेत तशीच ठेवण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने २१ जुलै २०१७ रोजी प्रथम वृक्ष प्राधिकरणाला सादर केला होता. परंतु, यासंदर्भात पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर ही झाडे कापण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र, न्यायालयाने यासंदर्भात पर्यावरण प्रेमी तसेच वृक्षप्रेमींचे म्हणणे ऐकून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार १० ऑक्टोबर २०१८ रोजी लोकांकडून हरकती आणि सूचना जाणून घेण्यात आल्या. या हरकती आणि सूचनांचा अहवाल वृक्ष प्राधिकरणाने न्यायालयात सादर केला होता. तत्पूर्वी २१ सप्टेंबर २०१८ रोजी या खात्यातील अधिकार्‍यांनी याची पाहणी केली होती. ४ जुलै २०१९ रोजी वृक्षप्राधिकरण सदस्यांनी याची पाहणी केली. त्यानुसार हा प्रस्ताव पुन्हा एकदा वृक्ष प्राधिकरणापुढे मंजुरीला आला आहे. आरे वसाहतीतील मेट्रो कार डेपोच्या बांधकामात अडथळा ठरणारी २२३८ झाडे कापण्याचा आणि ४६४ झाडांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा आहे. मंगळवारच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आतापर्यंत आरेतील झाडे कापण्यास विरोध करणार्‍या शिवसेनेची भूमिका यावर आता काय राहील? याकडेच सर्वांचे लागले आहे.  

मेट्रोच्या तीन प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी --
आरेच्या जागेवर एकूण ३६६१ झाडे अस्तित्वात आहे. त्यातील २७०२ एवढी झाडे आरे वसाहती मेट्रो ३ कार डेपोच्या बाधंकामात बाधित होत आहेत. त्यातील २२३८ झाडे कापण्यात येणार आहे. ही झाडे कापण्यास मनसेने तीव्र विरोध केला होता. तसेच आरे बचावचा नारा देत सर्वच पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमी एकवटले होते. त्यानंतर शिवसेनेनेही याला पाठिंबा दिला होता. शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही आरेतील झाडे कापण्यास विरोध दर्शवला होता. मात्र आता युती भक्कम झाल्यामुळे शिवसेनेचा विरोध मावळला आहे. पर्यावरण प्रेमींची सुनावणी झाली असली तरी त्यांचे काही समाधान झालेले नाही. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनी हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीला आला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom