बेकायदा पार्किंग - महिनाभरात ६७ लाख दंडवसुली

मुंबई - बेकायदा पार्किंग करणाऱ्यांना चाप बसावा आणि वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या दंडात्मक कारवाईत महिनाभरात ६७ लाख ६५ हजार ५६५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. एकूण १०४१ वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या संबंधित अधिका-याने दिली.

पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या वाहनतळावर गाडी पार्किंग न करता रस्त्यात पार्किंग केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत होती. शिवाय ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण शिवाय इंधनही वाया जात होते. यात होणारे नुकसान नागरिकांच्या लक्षात येत नव्हते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने बेकायदा पार्किंगला आळा घालण्यासाठी दंडाची कारवाई सुरू केली. वाहनतळालगतच्या एक कि.मी. परिसरात बेकायदा पार्किंग केल्यास वाहन चालकाकडून १० हजार रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र सर्वच नगरसेवकांनी या निर्णयाला विरोध करीत १ किलोमीटरऐवजी अंतर कमी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे प्रशासनाने १ किलोमीटरऐवजी अंतर अर्ध्यावर आणत ५०० मीटरवर बेकायदा पार्किंग केल्यास दंडआकारणीचा नियम केला आणि गेल्या ७ जुलैपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 

अवजड वाहनासाठी बेकायदा पार्किंगबद्दल दहा हजार व टोचन ५ हजार असे १५ हजार रुपये वसूल करण्यात येत आहेत. तर चारचाकी वाहनासाठी टोचनसह १०,००० रुपये, दुचाकीसाठी ५,००० रुपये दंड आकारण्यात येत आहे. पालिकेच्या वाहनतळांपैकी २६ ठिकाणी यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

मुंबईत १४६ वाहनतळ असून ३४ हजार ८०८ वाहने उभी करण्याची सुविधा आहे. मात्र सध्या २६ वाहनतळांच्या परिसरात दंडात्मक कारवाई सुरू आहे. दंडाच्या कारवाईला सुरुवात ७ जुलैला झाली. या पहिल्याच दिवशी बेकायदा पार्किंगचा पहिला फटका लोअर परळ-प्रभादेवीच्या वाहनमालकाला बसला. त्याच्याकडून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याच दिवशी एकूण ५६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ९ जणांनी ९० हजार रुपये दंड भरला. तर ४७ वाहनधारकांनी दंड न भरल्याने ती वाहने जप्त करण्यात आली. पालिकेच्या या धडक कारवाईमुळे बेकायदा वाहने पार्क करणा-यांची चांगलीच धावपळ उडाली. या कारवाईविरोधात रहिवाशांनी तीव्र विरोध केला. मलबारहिल येथे पहिल्याच दिवशी आंदोलन करून या मोहिमेला तीव्र विरोध करण्यात आला. मात्र महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाने कारवाई अजून तीव्र करीत चालूच ठेवली. त्यामुळे सुरुवातीच्या तीन दिवसातच २४३ वाहनांवर कारवाई होऊन ८ लाख ६९ हजार ८०० एवढी दंडवसुली करण्यात आली.

बेकायदा पार्किंगमध्ये जप्त केलेले वाहन वेळेत सोडवून न नेल्यास बिलंब शुल्कही आकारण्यात येत आहे. शिवाय महिनाभर त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्या वाहनाचा जाहीर लिलाव करण्याचीही तरतूद आहे. त्यामुळे बेकायदा पार्किंगचे प्रमाण कमी होत गेले. परिणामी महिनाभरात १०४१ वाहनांवर कारवाई करण्यात येऊन ६७,६५,५६५ रुपये दंड वसूल करण्यात आला.
एकूण सात परिमंडळांपैकी परिमंडळ २ मध्ये सर्वात जास्त म्हणजे ९,२७,०५५ रुपये दंड वसुली करण्यात आली, तर परिमंडळ ५ मध्ये सर्वात कमी म्हणजे ३०,११० रुपये दंडवसुली करण्यात आली.
जप्त वाहनांची वर्गवारी
चारचाकी - ६८४
तीनचाकी - २४
दुचाकी - ३३३
Tags