Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल - मुख्यमंत्री


मुंबई - मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये मेट्रो सेवेचे जाळे विणले जात असल्याने येत्या काही वर्षांत मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीमध्ये मोठा बदल झालेला दिसणार आहे. आज भूमिपूजन होत असलेल्या मेट्रो 10, मेट्रो 11 आणि मेट्रो 12 यामुळे मुंबई आणि उपनगरातील कनेक्टीव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे. आज देशातील मेट्रोचे सर्वात मोठे जाळे महाराष्ट्रात होत असून इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

फडणवीस म्हणाले, आज भूमीपूजन केलेल्या मेट्रो मार्गांमुळे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस पासून थेट ठाणे, मीरा-भाईंदर, डोंबिवली-कल्याण, नवी मुंबईपर्यंत जाता येणार आहे. या 3 लाईनमध्ये पुढील 10 वर्षात 40 लाख प्रवासी दररोज प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक यंत्रणांचे इंटिग्रेटेड करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 320 किमीच्या या मेट्रो मार्गामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काही मिनिटेच लागणार आहेत. सन 2021-22 पर्यंत 212 किमी आणि 2023-24 पर्यंत आणखी 85 किमी मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मेट्रो ही ग्रीन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. यामुळे जवळपास 2.5 कोटी टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे.

आज भूमिपूजन करण्यात आलेल्या मेट्रो भवनमध्ये सर्व मेट्रो सेवांचे संचलन होणार असून आर्टिफिशियल इंटिलिजन्सद्वारे मेट्रो चालविण्यात येणार आहेत. देशातील सर्वात मोठ्या प्रमाणात मेट्रो कोच निर्मितीचे कंत्राट ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत बीईएमएल या भारतीय कंपनीला देण्यात आले आहे. नागपूर, मुंबई, पुणे येथे मोठ्या प्रमाणात मेट्रोचे काम सुरू असून हायब्रीड मेट्रोच्या माध्यमातून छोट्यातील छोट्या रस्त्यांवर मेट्रो वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नाशिक येथे हायब्रीड मेट्रो सुरू करण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्याबद्दल फडणवीस यांनी प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने यावेळी आभार व्यक्त केले. तसेच चांद्रयान-2 मोहिमेत भारताच्या वैज्ञानिकांना प्रेरणा दिल्याबद्दलही त्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले, मुंबई हे आपल्या सर्वांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारे शहर आहे. मुंबई शहराचा काळाशी सुसंगत असा विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन संयुक्तपणे काम करीत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात वेगवेगळ्या योजनांचे भूमिपूजन करुन या योजना प्रत्यक्षात आणण्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या काळात पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारण्यावर भर देण्यात येईल. मेट्रो सेवेमुळे मुंबईकरांना सुरक्षित,सुखकर आणि जलद प्रवास करणे शक्य होणार आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे हे कलम 370 प्रत्यक्षात आणल्यामुळे सिध्द झाले आहे. आपल्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभूतपूर्व संशोधनामुळे चांद्रमोहिम यशस्वी ठरली आहे, असेच म्हणावे लागेल. आपल्या देशामध्ये ताकद, क्षमता आणि कुवत आहेच, पण योग्य दिशा दाखविणारे समर्थ नेतृत्व भारताला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाले आहे. मुंबई आणि मुंबई लगतच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुविधा देण्यासाठी येणारी मेट्रो भविष्यात महत्वाची भूमिका पार पाडेल.

कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या कोचचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री मोदी, राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो कोचची पाहणी केली. एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी यावेळी मेट्रो प्रकल्पाबद्दल अधिक माहिती दिली.

कार्यक्रमास व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच मंत्रीमंडळातील सदस्य राज्यमंत्री विद्या ठाकूर, राज्यमंत्री रवींद्र वायकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री योगेश सागर, राज्यमंत्री अविनाश महातेकर, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, खासदार राजन विचारे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom