पीएमसी बँक डबघाईला आणणारे अधिकारी भाजपाशी संलग्न


मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (PMC) बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. बँकेवर ही परिस्थिती ओढवली त्याला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा व त्यांची मालमत्ता जप्त करून ते पैसे गरीब खातेदारांना द्यावेत. या बँकेला आर्थिक डबघाईला आणणारे अनेक अधिकारी भाजपाशी संलग्न असणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार व मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (PMC) बँकेच्या खातेधारकांच्या शिष्टमंडळाने आरबीआयचे प्रशासकीय अधिकारी मौर्या यांची पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या भांडुप येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये भेट घेतली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पीएमसी बँकेची मॅनेजमेंट बरखास्त केलेली आहे. त्यामुळे या बँकेचे लाखो खातेधारकांना त्याचे नुकसान सोसावे लागत आहे. या खातेधारकांच्या समस्या व त्यांच्या मागण्या संजय निरुपम यांनी मौर्या यांच्यासमोर मांडल्या. खातेधारकांच्या मागण्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडताना संजय निरुपम म्हणाले. पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे आज आरबीआय ने पीएमसी बँकेची मॅनेजमेंट बरखास्त केलेली आहे. त्यामुळे या बँकेचे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. पण या सर्वांचा नाहक त्रास निष्पाप खातेधारकांना सहन करावा लागत आहे. आरबीआयने घातलेल्या निर्बंधांमुळे आज ग्राहकांना खात्यामधील पैसे वापरता येत नाहीत. आरबीआय ने या खातेधारकांच्या मागण्या मान्य करून त्यांना या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी निरुपम यांनी केली.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, उद्या शुक्रवार दि. २७ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी १२.३० वाजता, आम्ही पीएमसी बँकेच्या खातेधारकांचे शिष्टमंडळ घेऊन मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील पीएमसी बँकेच्या शाखेमध्ये, जिथे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे काम पाहिले जाते, त्यांच्या कार्यालयात जाणार आहोत आणि खातेधारकांच्या मागण्या मांडणार आहोत.

इतर मागण्या -
१. खातेधारकांना ६ महिन्यात फक्त १,००० रुपये काढण्याचे जे बंधन आरबीआय ने खातेधारकांवर लादलेले आहे, ते त्वरित रद्द करण्यात यावे. कारण ६ महिन्यांत फक्त १००० रुपये खात्यातून काढणे, म्हणजे एका महिन्यात फक्त १५० रुपये काढता येणार व या १५० रुपयांमध्ये तो एखादा व्यक्ती आपला घरखर्च कसा चालवणार. त्यामुळे हा नियम रद्द करण्यात यावा.
२. एखादया स्पेशल केस मध्ये म्हणजेएखाद्या व्यक्तीला आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी जर पैसे काढायचे असतील, तर त्यांना सर्व पैसे काढण्याची मुभा असावी. त्यासाठी आवश्यक ते कागदपत्रे खातेधारकाकडून घेऊन त्याला पैसे काढू द्यावेत.
३. शहरातील गृहनिर्माण संस्थांचे पीएमसी बँकेमध्ये मोठया प्रमाणात खाती आहेत. या सर्व खातेदार गृहनिर्माण संस्थांना मुक्तपणे व्यवहार करण्याची मुभा देण्यात यावी.