मुंबई विमानतळाला सर्वोत्कृष्ट पर्यटन पुरस्कार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2019

मुंबई विमानतळाला सर्वोत्कृष्ट पर्यटन पुरस्कार


नवी दिल्ली, 27 : पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्रप्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटकपूरक विमानतळाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातील अन्य तीन संस्थांनाही सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 2017-18’ वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशाच्या पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे राज्य, संस्था व व्यक्तींना विविध श्रेणीत सन्मानित करण्यात आले. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी आणि जागतिक पर्यटन संस्थेचे महासचिव झुराब पोलोलीकाशवीली यावेळी मंचावर उपस्थित होते.

विमानतळांच्या श्रेणीत देशातील दोन विमानतळांना सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला उच्च दर्जाच्या पर्यटक सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विमानतळाच्या एरो कमर्शियल विभागाचे उप महाव्यवस्थापक आदित्य पंसारी आणि सहायक महाव्यवस्थापक तन्वीर मौलवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

एकाच धावपट्टीवर 1004 हवाई उड्डाणाचा आपलाच विक्रम मोडीत काढणारे हे जगातील सर्वोत्कृष्ट विमातळ ठरले आहे. पर्यटकांना उत्तम सुविधा पुरविणा-या या विमानतळाने ताश्कंद, मँचेस्टर, फुकेट ,ग्वाँगझोवू , माले आणि दारेसलाम आदि शहरांसाठी नवीन उड्डाणसेवा सुरु केली आहे.

नाशिक व मुंबई येथील हॉटेल्सचाही सन्मान -
नाशिक शहरातील ‘एक्सप्रेस इन हॉटेल’ हे देशातील सर्वोत्कृष्ट तीन तारांकीत हॉटेल ठरले आहे. आधुनिकतेसह पारंपारीक वास्तुशैलीचा उत्तम नमुना असलेले हे हॉटेल पर्यटक व अतिथींना उत्तम सुविधा देणारे हॉटेल आहे.

मुंबई येथील ‘द ललीत हॉटेल’ हे वैविध्यपूर्ण बैठक व्यवस्था पुरविणारे देशातील सर्वोत्तम हॉटेल ठरले आहे. छोटेखानी बैठकीपासून, लग्न समारंभ, व्यावसायिक संमलेन आयोजनासाठी या हॉटेलने पुरविलेल्या वैविध्यपूर्ण सेवांची या पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली.

ग्रामीण भागात कृषी पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात अग्रणी असलेल्या मुंबई येथील ‘कल्चर आंगन’ या संस्थेला सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन प्रकल्पाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘कल्चर आंगन’ ही संस्था स्थानिक लोकांच्या मदतीने ग्रामीण भागात कृषी पर्यटन क्षेत्र विकसित करीत असून महाराष्ट्रासह, राजस्थान आणि आंध्रप्रदेशातही प्रकल्प राबवित आहे.

Post Bottom Ad