Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मतदार यादीतील नाव पडताळणीसाठी राजकीय पक्षांनीदेखील मतदारांना आवाहन करावे


मुंबई, दि. 9 : मतदार यादीतील नावाची पडताळणी करण्यासाठी राजकीय पक्षांनीदेखील सर्व मतदारांना आवाहन करावे, अशी विनंती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना केली आहे. विधानसभा निवडणूक-2019 च्या अनुषंगाने आज मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रामध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आल्यानंतर दि. 1 जानेवारी, 2019 या अर्हता दिनांकास 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी केल्यानंतर दि. 31 ऑगस्ट, 2019 रोजी मतदार यादी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यानुसार पुरुष मतदार 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 तर महिला मतदार 4 कोटी 27 लाख 05 हजार 777 आणि तृतीयपंथी मतदार 2593 असे एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदार संख्या असल्याची माहिती सिंह यांनी दिली.

15 जुलै, 2019 नंतर मतदार यादीमध्ये सुमारे 10 लाख 73 हजार 757 इतके नवीन मतदार यादीमध्ये समाविष्ट झाले असून 2 लाख 16 हजार 228 इतके मतदार वगळण्यात आले आहेत. उपरोक्त मतदार यादीमध्ये ज्या मतदारांची नोंदणी झालेली नाही अथवा काही कारणास्तव मतदारांची नावे कमी करण्यात आलेली आहेत, अशा मतदारांना अजूनही नोंदणी करता येईल. निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिनांकापूर्वी 10 दिवसांपर्यंत अशी नोंदणी करता येणार आहे. तेव्हा मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही याची आजच पडताळणी करुन घ्यावी, असे आवाहन सर्व राजकीय पक्षांनी आपल्या यंत्रणेमार्फत सर्व मतदारांना करावे, असे सिंह म्हणाले.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 अन्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीचे अनुपालन करुन, पूर्वीच्या मतदार यादीतील मयत झालेल्या, अन्यत्र स्थलांतरित झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, अशा वगळण्यात आलेल्या नावांची यादी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहे.

राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरिता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकर्त्याची बुथ लेवल एजंट नेमणूक करावी व शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बुथ लेवल ऑफिसर यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. मतदारांना सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी तसेच, यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.

अपंगांसाठी सुविधा -
आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यात येत आहे. या अंतर्गत अद्ययावत मतदार यादीच्या अनुषंगाने मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या ‘सुलभ निवडणुका’ या घोषवाक्यानुसार अपंग मतदारांसाठी सर्व सोयी व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. पहिल्या किंवा त्यापेक्षा वरच्या मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रांना तळ मजल्यावर आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, अशी विनंती सिंह यांनी केली.

यावेळी झालेल्या चर्चेत प्रामुख्याने मतदार याद्यांची उपलब्धता, मतदान केंद्रविषयक अडी अडचणी, बोगस मतदार तपासणी, एक खिडकी योजना, विविध परवानग्या, ईव्हीएम संदर्भात चर्चा, विविध वस्तू व सेवांचे दर अशा बऱ्याच निवडणूक विषयक बाबींबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी यावेळी निवडणूक आचार संहिता, खर्चविषयक माहिती याबाबत प्रतिनिधींसमोर संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली.

या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर, शिवाजी जोंधळे, सह मुख्य निवडणूक अधिकारी अ.ना.वळवी, शिरीष मोहोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम तसेच भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, बहुजन समाज पार्टी सह अन्य पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom