भारतात पाकिस्तानपेक्षाही अधिक उपासमारी


नवी दिल्ली - भारतात उपासमारीची समस्या अधिक गंभीर झाल्याचं ग्लोबल हंगर इंडेक्समधून (जीएचआय) समोर आलंय. ११७ देशांच्या यादीत भारत १०२ व्या क्रमांकावर फेकला गेलाय. दक्षिण आशियाई देशांमधील हा सर्वांत खालचा क्रमांक आहे. दक्षिण आशियातील इतर देश हे ६६ ते ९४ व्या स्थानावर आहेत. भारत या यादीत ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्याही मागे आहे. तर पाकिस्तान या यादीत ९४व्या क्रमांकावर आहे.

२०१५च्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत ९३व्या क्रमांकावर होता. त्यावेळी दक्षिण आशियामध्ये पाकिस्तान हा एकमेव देश होता जो या जीएचआयमध्ये भारताच्याही मागे होता. पण पाकिस्तानने यंदा भारताला मागे टाकत ९४ वे स्थान मिळवले आहे. २०१४ ते २०१८ या कालावधीत मिळवलेल्या आकडेवारीवर हा ग्लोबल हंगर इंडेक्स बनवण्यात आला आहे. विविध देशांमधील कुपोषित मुलांची लोकसंख्या, वजनाखालील किंवा त्यापेक्षा कमी वयाखालील मुलांची टक्केवारी आणि बालमृत्यू दर यावर आधारीत ही आकडेवारी आहे.

नेपाळने केली उत्तम प्रगती -
भारतात ६ ते २३ महिन्यांच्या ९.६ टक्के मुलांनाच पुरेसं अन्न मिळतं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात ही आकडेवारी केवळ ६.४ टक्केच आहे. तर भारताच्या तुलनेत नेपाळमध्ये २००० पासून सर्वाधिक सुधारणा झाली आहे, असं जागतिक अहवालात म्हटलंय.

भारतातील भूक समस्या गंभीर -
उपासमारीच्या आधारावरून देशांना ० ते १०० गुण दिले गेलेत आणि जीएचआय तयार केला गेलाय. त्यातील ० हा अंक सर्वोत्तम म्हणजे उपासमारी नाही. तर १० पेक्षा कमी गुण म्हणजे देशात उपासमारी फारच कमी आहे. त्याचप्रमाणे २० ते ३४.९ गुणे म्हणजे उपासमारीचे संकट गंभीर झाले आहे. तर ३५ ते ४९.९ गुण म्हणजे उपासमारीची आव्हानात्मक स्थिती आहे. यापेक्षा अधिक म्हणजे ५० गुण असतील तर संबंधित देशात उपासमारीची स्थिती अत्यंत भयावह असल्याचं समजलं जातं. यात भारताला ३०.३ गुण मिळाले आहेत. याचा अर्थ भारतात उपासमारीचे गंभीर संकट आहे. तर मध्य आफ्रिकेतील चार देशांमध्ये उपासमारीची अत्यंत भयावर स्थिती आहे.

हवामान बदलाचे आव्हान -
हवामान बदलामुळे उपासमारीचे संकट वाढत आहे. जागतील अनेक भागांमध्ये उपासमारीचे प्रमाण वाढत आहे. तसंच अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेवरही विपरीत परिणाम होतोय. तसंच शेती उत्पादनातील पोषक घटकांचं प्रमाणही कमी झालंय.
Tags