AD BANNER

केईएम रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 'प्रिन्स'चा मृत्यू


मुंबई - केईएम रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे इसीजी मशिनमध्ये बिघाड होऊन हात व कान गमवावा लागलेल्या चार महिन्याच्या निष्पाप प्रिन्स राजभरचा गुरुवारी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास मृत्यू झाला. मागील दोन दिवसांपासून प्रिन्सची प्रकृती खालावली होती. त्याला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. अखेर ह्दय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

उत्तरप्रदेशाच्या महू जिल्ह्यातील चिमुकल्या प्रिन्स राजभरच्या हदयात छिद्र असल्याने त्याला उपचारांसाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रिन्सच्या शरीराला लावण्यात आलेल्या इसीजी नॉड्समध्ये बिघाड झाल्याने शॅार्टसर्किट झाले त्यात प्रिन्स भाजला. यात बाळाचा हात गंभीररीत्या भाजल्याने शस्त्रक्रिया करून हात काढून टाकावा लागला. या दुर्घटनेत बाळाच्या कानालाही मोठ्या प्रमाणात इजा झाली होती. प्रिंन्सची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात होती. रक्तदाबामध्ये सातत्याने चढउतार जाणवत होते. त्यामुळे कृत्रिम श्वसनयंत्रणेवर त्याला ठेवले होते. न्युमोनिया झाल्याने त्याचा संसर्ग पोटात आणि फुफ्फुसात वाढला होता. परिणामी उपचारांना योग्यरित्या प्रतिसाद तो देत नव्हता. गुरुवारी त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने केईएम रुग्णालय प्रशासनाने प्रिंन्सच्या पालकांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, मध्यरात्री २.३० च्या सुमारास प्रिन्सला हृदयविकाराचा झटका आला. यावेळी उपचार सुरु असतानाच मध्यरात्री २.४५ वाजता त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

तात्काळ दहा लाखांची नुकसान भरपाई द्यावी --
'प्रिंन्स' प्रकरणाचे पालिकेच्या महासभेत, स्थायी समितीत पडसाद उमटले होते. सर्वपक्षीय नगरसेवकांनी यावेळी प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनाने यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली. तसेच प्रिंन्सला दहा लाखांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. त्यापैकी ५ लाख प्रिंन्सच्या कुटुंबियांना दिले जाणार होते. तर ५ लाख फिक्स डिपोझिटमध्ये त्यातून मिळणाऱ्या व्याजातून उपचार व शिक्षणाचा खर्च भागवला जाणार होता. मात्र, दुर्दैवाने प्रिन्सचा मृत्यू झाल्याने दहा लाखाची तात्काळ मदत प्रिंन्सच्या कुटुंबियांना देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
Previous Post Next Post