Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी, कोरोना रुग्णांची संख्या १४ वर


मुंबई - देशभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात पहिला बळी घेतला आहे. या रुग्णावर मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. ६३ वर्षिय या रुग्णांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. कोरोनाचा संसर्ग वाढतो असून मुंबईत आणखी एक कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे महामुंबईत कोरोना रुग्णांची संख्या एकूण १४ वर पोहचली आहे. यात मुंबईत ६ व मुंबईबाहेरच्या ८ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, यातील एकाची प्रकृती गंभीर असून या रुग्णाला वेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाच्या उपअधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

देशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली व कर्नाटकमध्ये कोरोनाचे दोन बळी गेल्यानंतर मंगळवारी महाराष्ट्रात एका रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातला हा पहिला बळी आहे. त्यामुळे भारतात आतापर्यंत कोरोनाचे तीन मृत्यू झाले आहेत. मंगळवारी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेणारा ६३ वर्षिय रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण दुबईहून मुंबईत आला होता. सुरुवातीला ८ मार्च रोजी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतले. त्यानंतर १३ मार्चला या रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला हा रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत होतो. त्याला उच्च रक्तदाबाचा दिर्घकालीन आजार व न्युमोनियाही होता. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या या रुग्णाला न्युमोनिया तसेच दृदयाला सूज येऊन ह्दयाचे ठोके वाढल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, मंगळवारी आणखी एक नवा कोरोना संसर्ग रुग्ण आढळला आहे. तर एका रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्याला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. कस्तुरबा रुग्णालयात एकूण ६०० संशयित रुग्ण तपासणीसाठी आले होते. त्यातील ५४० रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तर ४७६ रुग्णांना डिसचार्ज देण्यात आला. सद्या १२३ रुग्ण दाखल आहेत. मागील २४ तासात १३१ जणांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यातील १३० नमुने निगेटिव्ह आले असून एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत सहा तर मुंबईबाहेरील ८ असे १४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह -
कस्तुरबात मंगळवारी दिवसभरात १३१ संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यात आले. त्यातील १३० नमुने निगेटिव्ह आढळले आहेत. मात्र, अमेरिकेतून प्रवास करून आलेल्या मुंबईतील ४९ वर्षाच्या पुरुषाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्याच्यावर कस्तुरबात उपचार सुरु आहेत. ही व्यक्ती ७ मार्चला मुंबईत परतली. त्याच्या सहवासातील जवळच्या ४ व्यक्तींनाही खबरदारीचा उपाय म्हणून ऍडमिट करण्यात आले आहे. तर त्याच्या संपर्कात आलेल्या इतर ११ जणांना कोरोनाची लक्षणे दिसतात का, हे पाहण्यासाठी घरातच राहण्याच्या आणि वेळोवेळी डॉक्टरांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना पालिका प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. 

लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचारासाठी दाखल व्हा -
परदेशातून येणारी व्यक्ती व त्यांचे निकट असलेल्या व्यक्ती अशा दोन प्रकारातून सध्या भारतात कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे जे परदेशातून प्रवास करून मुंबईत आले आहेत त्यांनी व त्यांच्या निकट असलेल्या व्यक्तींनी घरातच एका वेगळ्या खोलीत १४ दिवस थांबावे. मधुमेह, रक्तदाब तसेच गरोदर महिलापासून लांब राहावे. १४ दिवसांत किंवा नंतर सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ कस्तुरबा रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे डॉ. शाह यांनी सांगितले.

जोगेश्वरीच्या ट्रामामध्ये विलगीकरण कक्ष -
मंगळवारपासून जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रामा सेंटरमध्ये विलगीकरण (आयसोलेशन वॉर्ड) कक्ष सुरु करण्यात आले आहे. बुधवारपासून ओपीडी सुरु केली जाणार आहे. रुग्णांना अॅडमिट व तपासणी तसेच रिपोर्टही तेथेच उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. गरज असल्यास अजून तीन रुग्णालयात बेड तयार करण्यात आले आहेत.

Top Post Ad

Below Post Ad